डॉक्टरला मागितली 2 लाखांची खंडणी, कारमध्ये डांबलं एटीएमपर्यंत नेलं अन्…

सदरच्या (मनपा) पंचकर्म रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याला पाहून घेण्याची धमकी देत दोन लाखांची खंडणी मागण्यात आली. आरोपी त्यांना त्यांच्याच कारमध्ये डांबून एटीएमपर्यंत घेऊन गेले. 35 हजार रुपये घेतल्यानंतर त्यांची सुटका केली. ही खळबळजनक घटना सोनेगाव पोलिस ठाण्यांतर्गत शिवणगावात घडली.

    नागपूर : सदरच्या (मनपा) पंचकर्म रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याला पाहून घेण्याची धमकी देत दोन लाखांची खंडणी मागण्यात आली. आरोपी त्यांना त्यांच्याच कारमध्ये डांबून एटीएमपर्यंत घेऊन गेले. 35 हजार रुपये घेतल्यानंतर त्यांची सुटका केली. ही खळबळजनक घटना सोनेगाव पोलिस ठाण्यांतर्गत शिवणगावात घडली.

    याप्रकरणी पोलिसांनी पीडित डॉ. गजानन पवाने (वय 53, रा. एमआयजी कॉलनी, मेडिकल चौक) च्या तक्रारीवरून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. आलोक मेश्राम (वय 40, रा. सुगतनगर) आणि त्याचा साथीदार अश्विन तांगडे (वय 35, रा. बेझनबाग) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आलोक हा कॅटरींगचे तर अश्वीन मेट्रोमध्ये हाउसकिपिंगचे काम करतो. पोलिसांनी त्यांच्याकडून 35 हजार रुपयेही जप्त केले.

    मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. पवाने यांचे शिवणगावात रुग्णालय आहे. तसेच ते सदरच्या पंचकर्म येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 16 डिसेंबरच्या रात्री त्यांनी दवाखाना बंद केला आणि घरी जाण्यासाठी निघणार तोच दोन्ही आरोपी कारने आले. तुम्ही सेवा करता की रुग्णांना मारता? मी नेता आहे. तुमच्याकडे किती संपत्ती आहे, याची माहिती आहे. दोन लाख रुपये दिले नाही तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना पाहून घेऊ, अशी धमकी दिली.

    त्यानंतर घाबरललेल्या पवाने यांना दोघांनीही कारमध्ये बसण्यास सांगितले. मात्र, डॉक्टर स्वतःच्याच कारमध्ये बसून राहिले. आलोक जबरदस्तीने त्यांच्या कारमध्ये शिरला व त्यांचा मोबाईल फोन हिसकावून घेतला. त्यानंतर त्यांना वर्धा मार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये घेऊन गेला.