`गुजरातचा रहिवासी व्यक्तीने महाबळेश्वरच्या कड्यावरुन उडी मारत केली आत्महत्या; आधार कार्डवरुन मृतदेहाची ओळख

महाबळेश्वर शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या केट्स पॅांईटच्या कड्यावरून गुजरात येथील पर्यटक अनिल अग्रवाल याने आत्महत्या केली.

    महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या केट्स पॅांईटच्या कड्यावरून गुजरात येथील पर्यटक अनिल अग्रवाल (वय वर्षे ६६) राहणार आत्माराव अग्रवाल C/801 एकता अनुवऐ B/ H एकता टॅावर वसना बर्रागे रोहद वसनाअहमदाबाद ,पालडी ,गुजरात येथील पर्यटकाने बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान आत्महत्या करून आपले जीवन संपवले.

    याबाबत पाचगणी पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास केटस पॉइंट, महाबळेश्वर येथील निडल होल येथील कड्यावरून एक अनोळखी पुरूषाने कड्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना काही पर्यटकांनी पाहिली.  त्यांनी ही माहिती तेथील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. बुधवारी रात्री उशीर झाल्याने त्या पर्यटकाचा शोध घेता आला नाही. आज सकाळी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी कडयात उतरण्याचा निर्णय घेतला. सकाळी महाबळेश्वर ट्रेकर्सला खोल दरीत एक मृतदेह आढळून आला. ट्रेकर्सच्या जवानांनी खोल दरीतून पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढला. मयताच्या अंगावरील कपडयात आढळलेल्या आधार कार्ड वरून त्या पर्यटकाची ओळख पटली आहे. त्याआधारे पाचगणी पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.

    मयत अनोळखी पुरुषाचे वय अंदाजे ६६ वर्षे, अर्धवट टक्कल असून पांढरे केस,अंगात निळ्या रंगाची जिन्स पँट, उजव्या हातात लाल रंगाचा धागा आहे.तरी अशा वर्णनाच्या इसमाबाबत काही उपयुक्त माहिती असल्यास पाचगणी पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन पाचगणी पोलिसांनी केले आहे. या घटनेची नोंद पाचगणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार निलेश माने करीत आहेत