हेलिकॉप्टर हवंय! सेवानिवृत्त माजी सैनिकाने घरी जाण्यासाठी रस्ता नसल्या कारणाने मुख्यमंत्र्यांकडे केली हेलिकॉप्टरची मागणी

शेवगाव तालुक्यातील सालवडगाव येथील रहिवासी दत्तू भापकर या सेवानिवृत्त माजी सैनिकाने आपल्या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याकारणाने मला हवेतून म्हणजे हेलिकॉप्टर मधून जावं लागणार आहे

    शेवगाव : शेवगाव तालुक्यातील सालवडगाव येथील रहिवासी दत्तू भापकर या सेवानिवृत्त माजी सैनिकाने आपल्या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याकारणाने मला हवेतून म्हणजे हेलिकॉप्टर मधून जावं लागणार आहे. यासाठी मला हेलिकॉप्टर खरेदी करायचे आहे व यासाठी मला सरकारी अनुदान मुख्यमंत्री यांनी द्यावे, अशी मागणी सेवानिवृत्त माजी सैनिक भापकर यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

    सेवानिवृत्त झाल्यानंतर आपले सेवा निवृत्ती नंतरचे जीवन हे आनंदाने सुखा समाधानाने जावे, असे प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांची इच्छा असते. परंतु शेवगाव तालुक्यातील सेवानिवृत्त आर्मी जवान दत्तू भापकर यांना मात्र वेगळा अनुभव आला आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपले गाव सालवडगाव येथे आपला पुढील उदरनिर्वाह करण्याचे ठरवले. ते सालवडगाव येथील हनुमान वस्तीवर राहतात. या वस्तीवर येण्या जाण्यासाठी ना रस्ता आहे ना शाळेत मुलांना जाण्यासाठी रस्ता.. इतकेच काय तर आजारी असलेल्या व्यक्तींना वेळेवर वैद्यकीय सुविधाही मिळत नाहीत. या वस्तीवर स्वातंत्र्यानंतरही ७५ वर्षे लोटून अद्यापपर्यंत रोड नसल्या कारणाने त्यांनी अनेक वेळा सरकारी दरबारी या संदर्भात पाठपुरावा केला. परंतु त्यांना सरकारी दरबारी न्याय मिळालाच नाही. शेवटी त्यांनी वैतागून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मला रस्ता नसल्या कारणाने अनुदानित हेलिकॉप्टर घ्यायचे आहे.यासाठी मला मुख्यमंत्री यांनी सरकारी अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे आज केली आहे.

    या निवेदनाच्या प्रती त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अहमदनगर दक्षिणेचे खासदार सुजय विखे, शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, शेवगावचे तहसीलदार छगन वाघ यांना पाठविलेल्या आहेत.