गॅस एजन्सीवर दरोडा; कॅशिअरवर हल्ला करून 12.57 लाखांची रोकड लुटली

वाडीतील डिफेन्स क्वॉर्टर्स परिसराजवळ दुचाकीवर आलेल्या आरोपींनी दिवसाढवळ्या गॅस एजन्सीच्या कॅशियरला जखमी करून 12.57 लाखांची रोकड लुटली. हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या तीन दिवस आधी घडलेल्या या घटनेने शहर पोलिसांत खळबळ उडाली आहे.

    नागपूर : वाडीतील डिफेन्स क्वॉर्टर्स परिसराजवळ दुचाकीवर आलेल्या आरोपींनी दिवसाढवळ्या गॅस एजन्सीच्या कॅशियरला जखमी करून 12.57 लाखांची रोकड (Robbery at Gas Agency) लुटली. हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या तीन दिवस आधी घडलेल्या या घटनेने शहर पोलिसांत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वाडी पोलिसांनी सिद्धार्थ रामचंद्र सुखदेवे (वय 59, रा. वसंत विहार, खडगाव रोड) च्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.

    अमरावती मार्गावरील डिफेन्स क्वॉर्टरजवळील तुलसी चौकात एचपी गॅस एजन्सी आहे. मागील 40 वर्षांपासून सिद्धार्थ तेथे व्यवस्थापक व कॅशिअर अशी दोन्ही कामे सांभाळतात. कंपनीचे युको बँकेत खाते आहे. शनिवार व रविवार सुट्टीचा दिवस असल्याने एजन्सीच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाले होते. सोमवारी सकाळी सिद्धार्थ कार्यालयात आले. एका बॅगमध्ये 12.57 लाख ठेवून बँकेत जमा करण्यासाठी दुचाकीने निघाले. सुमारे 200 मीटर अंतरावर मागून आलेल्या दोन दुचाकीस्वार तरुणांनी सिद्धार्थ यांना थांबण्याचा इशारा केला. बॅगेत मोठी रोकड असल्याने सिद्धार्थ यांनी दुर्लक्ष करत पुढे निघाले.

    मागे बसलेल्या तरुणाने सिद्धार्थ यांच्या डोक्यावर दांड्याने वार केला. सिद्धार्थ दुचाकीसह जमिनीवर पडले. त्यानंतर आरोपींनी सिद्धार्थ यांच्याकडील बॅग हिसकावून घेतली. अतिशय वेगाने घडलेल्या या घटनेत जखमी सिद्धार्थ यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, आरोपी एका गल्लीतून पळून गेले. सिद्धार्थ यांनी एजन्सी संचालकांना घटनेची माहिती दिली.

    काही वेळातच वाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सिद्धार्थ यांना रुग्णालयात दाखल केले. तोलानी चौक संकुलात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. फुटेजमध्ये दोन तरुण दिसत आहेत. कोणीतरी टीप दिल्याने ही घटना घडल्याचा पोलिसांना संशय आहे.