भाडे तत्त्वावर कार लावण्याच्या बहाण्याने गंडा घालणारा जाळ्यात ; सात गुन्ह्यांची उकल; ४३ लाखांचा ऐवज जप्त

बड्या कंपनीत चारचाकी भाडे तत्त्वावर लावण्याच्या बहाण्याने गाडी घेऊन फसवणूक करणाऱ्या एका भामट्याल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून शहरातील ७ गुन्ह्यांची उकलकरत ४३ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. त्याने मौजमजा करण्यासाठी हा उद्योग केला असल्याचे समोर आले आहे.

    पुणे : बड्या कंपनीत चारचाकी भाडे तत्त्वावर लावण्याच्या बहाण्याने गाडी घेऊन फसवणूक करणाऱ्या एका भामट्याल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून शहरातील ७ गुन्ह्यांची उकलकरत ४३ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. त्याने मौजमजा करण्यासाठी हा उद्योग केला असल्याचे समोर आले आहे.

    सयाजी ज्ञानदेव पाटील (वय ३८, रा. मानाजीनगर, नर्हे, मुळ. पलुस, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा नोंद होता. याबाबत अभिजीत अनिल रतवेकर (वय ३६) यांनी तक्रार दाखल केली आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार, सुरेंद्र साबळे, ज्ञानेश्वर चित्ते व त्यांच्या पथकाने केली आहे.

    अभिजीत हे चालक आहेत. त्यांच्याकडे इर्टिगा चारचाकी होती. दोघांची ओळख झाल्यानंतर सयाजी याने त्यांना चारचाकी एका कंपनीत भाड्याने लावतो. महिन्याला ५० हजार रुपये मिळतील अशी बतावणी केली. तक्रारदारांनी चारचाकी दिली असता त्याने कार नेली. पण, पैसे किंवा त्यांची कार परत न देता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर गुन्हे शाखेकडून याचा समांतर तपास सुरू होता. तत्पुर्वी शहरात अशा प्रकारे अनेकांची फसवणूक झाल्याबाबत तक्रारी दाखल आहेत. त्यासोबतच भाड्याने ऑनलाईन कार बुककरून देखील फसवणूक होत असल्याने पोलिसांकडून याचा तपास सुरू होता.

    गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार हे तपास करत होते. तेव्हा पथकातील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते यांना बातमीदारामार्फत सयाजी पाटील याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानूसार, पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली. तसेच, तक्रारदार यांची साडे पाच लाख रुपयांची इर्टिगा कार जप्त केली. संशय बळावल्याने पथकाने त्याच्याकडे सखोल तपास केला. तेव्हा त्याने वारजे, नर्हे, सातारा, बोपखेल, धायरी तसेच इतर एकाची देखील अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडून पोलिसांनी फसवणूक केलेल्या तब्बल ४३ लाख ५० हजार रुपयांच्या ७ कार जप्त केल्या आहेत. त्याने मौजमजा करण्यासाठी या कार चोरल्याचे सांगितले आहे. त्याच्याकडे सखोल तपास केला जात आहे.