
काँग्रेसचा बडा नेता भाजपाच्या वाटेवर; गडहिंग्लज उपविभागातील राजकीय समीकरणे बदलणार
गडहिंग्लज : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. अनेक नेते पक्षही बदलत आहेत. अशातच आता गडहिंग्लज उपविभागातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यात आमदार शिवाजी पाटील यांच्या राजकीय खेळीतून काँग्रेसचे विनायक तथा अप्पी पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे.
विनायक तथा अप्पी पाटील यांनी गतवेळची निवडणूक काँग्रेसचे तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून शिवाजी पाटील यांच्या विरोधात लढविली होती. परंतु त्यांना सलग दोन वेळा अपयश आले. कर्नाटकातील बडे राजकीय प्रस्थ जारकीहोळी यांचे अप्पी पाटील मेहुणे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अप्पी पाटील गटाला सन्मानजनक जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी मुंबई येथे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने त्यांचा भाजपा पक्ष प्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. शनिवारी दुपारी शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे अप्पी पाटील यांनी मंत्री चंदकांत पाटील यांची कार्यकर्त्यांसमवेत भेट घेतली. अप्पी यांच्या भाजपा पक्ष प्रवेशाने काँग्रेसच्या आमदार सतेज पाटील, खासदार शाहू महाराज यांना धक्का बसला आहे.
गिरीजादेवी शिंदे उतरणार मैदानात
नेसरी सरपंच गिरीजादेवी संग्रामसिंह शिंदे-नेसरीकर यांनी नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाने, भाजपा प्रांतिक सदस्य संग्रामसिंह कुपेकर देसाई आणि माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. हेमंत कोलेकर यांच्या समोर अडचणी वाढल्या आहेत.