ज्येष्ठ शिक्षकाला टोळक्याकडून मारहाण ; पाचगणी येथील प्रकार

लुटण्याचा प्रयत्न

    वाई : पाचगणी येथे एका ज्येष्ठ शिक्षकाला चार ते पाच जणांच्या टोळक्याने अमानुष पद्धतीने मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.यामुळे पांचगणी या शैक्षणिक केंद्रावर खळबळ उडाली आहे. याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

    याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक जगन्नाथ हेगडे (वय ५८) (रा.गोडवली ता. महाबळेश्वर) हे नेहमीप्रमाणे आपले शिकवणीचे काम उरकून टेबल लॅंन्ड मार्गे मंगळवारी  रात्री साडे नऊ वाजनेच्या सुमारास गोडवलीला जात होते. ते कॉनव्हेंट हायस्कूलच्या समोर असणाऱ्या पाण्याच्या  टाकीजवळ आले असता अचानक पाच ते सहा अनोळखी व्यक्तींनी हेंगडे यांना अडवले. यावेळी त्यांनी त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून घेतली. त्या पिशवीत काही नाही समजताच त्यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी हेगडे यांनी माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितले. या युवकांनी त्यांना शिवीगाळ करत मारुन टाकण्याची धमकी देत त्यांचे खिसे चाचपून खिशात असणारे तीनशे रुपये काढून घेतले. हेंगडे यांच्याकडे कमी पैसे मिळाल्याने या अज्ञात युवकांनी त्यांना हाताने व दगडाने जबर मारहाण करत गंभीर जखमी केले. या मारहाणीत हेगडे यांच्या डोक्याला जखम झाल्याने ते रक्तबंबाळ झाले. त्यांच्यावर पांचगणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढीलतपास पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने करीत आहेत.