संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

सांगली जिल्ह्यातील कवलापूर या गावात रस्त्याकडेच्या लिंबाच्या झाडाला एका जिवंत बोकडाचे मागील दोन पाय दोरीने बांधल्याचा प्रकार समोर आला. या बोकडाला लिंबाच्या झाडाच्या फांदीला उलटे लटकवून ठेवले होते.

    कवलापूर : सांगली जिल्ह्यातील कवलापूर या गावात रस्त्याकडेच्या लिंबाच्या झाडाला एका जिवंत बोकडाचे मागील दोन पाय दोरीने बांधल्याचा प्रकार समोर आला. या बोकडाला लिंबाच्या झाडाच्या फांदीला उलटे लटकवून ठेवले होते. आठवडाभर ते बोकड त्याच अवस्थेत राहिल्यामुळे त्या बोकडाचा तडफडून मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    मागील आठवड्यात झालेल्या दर्श सोमवती अमावस्येच्या दिवशी हा प्रकार घडला. ही घटना अंधश्रद्धेतून घडल्याचे समोर आले आहे. कवलापूर येथील एका जागरूक नागरिकाने याबाबतची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिली. त्यानंतर तातडीने अंनिसच्या कार्यकर्त्यांनी येथे जाऊन या घटनेची पाहणी केली. तेव्हा त्यांना तासगाव रोडपासून 50 फूट अंतरावरील शेतातील एका लिंबाच्या झाडाला एक वर्षे वयाचे, अंदाजे दहा किलो वजनाचे बोकडाचे मागील दोन पाय दोरीने बांधून त्याला उलटे टांगलेले आढळून आले.

    हा सर्व प्रकार अमावस्येच्या रात्री ज्याप्रकारे केला आहे, यामागे अघोरी प्रथा आणि अंधश्रद्धेचा प्रकार दिसून येतो. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की पाडव्याच्या आदल्या दिवशी असणाऱ्या सोमवती अमावस्येच्या रात्री एक गाडी रस्त्याकडेला येऊन थांबली होती. त्यातील लोकांनी हा प्रकार केला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

    पोलिसांचे आवाहन

    पोलिसांनाही या प्रकाराबद्दल माहिती नव्हती. याप्रकाराबद्दल अधिक माहिती कोणाला असल्यास त्यांनी पोलिसांशी किवा अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. तसेच अशा प्रकारामुळे घाबरून न जाता नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार करून अंधश्रद्धेला आपल्या आयुष्यात धारा देऊ नये, असेही आवाहन अंनिसने केले आहे.