पिंपरीत दुकानदाराकडून ग्राहकाला मारहाण, आरोपीवर गुन्हा दाखल

पिंपरीतून एक खळबळजनक बातमी आली आहे. शूज खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहक दाम्पत्याला दुकानदाराने बेदम मारहाण केली. ग्राहक महिलेचा विनयभंग करून ठार मारण्याची दुकानदाराने धमकी दिली. ही घटना शनिवारी सकाळी गुरुद्वारा रोड पिंपरी येथील हॉंगकॉंग स्पोर्ट्स शॉप येथे घडली.

    पिंपरी : पिंपरीतून एक खळबळजनक बातमी आली आहे. शूज खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहक दाम्पत्याला दुकानदाराने बेदम मारहाण केली. ग्राहक महिलेचा विनयभंग करून ठार मारण्याची दुकानदाराने धमकी दिली. ही घटना शनिवारी सकाळी गुरुद्वारा रोड पिंपरी येथील हॉंगकॉंग स्पोर्ट्स शॉप येथे घडली. जयप्रकाश वासवानी (रा. गुरुद्वारा रोड, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 44 वर्षीय ग्राहक महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या पतीसोबत स्पोर्ट्स शूज खरेदी करण्यासाठी शनिवारी सकाळी नऊ वाजता गुरुद्वारा रोड पिंपरी येथील हॉंगकॉंग स्पोर्ट्स शॉपमध्ये गेल्या. दुकानातून त्यांनी एक स्पोर्ट्स शूज खरेदी केले. त्याचे पैसे त्यांनी दिले. मात्र, दिलेले पैसे आणि शूजची एमआरपी यात फरक असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी दिलेले पैसे परत मागितले. त्यावरून आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केली.

    फिर्यादी यांनाही अश्लील शिवीगाळ करत त्यांच्याशी गैरवर्तन करत आरोपीने विनयभंग केला. आरोपीने दुकानातील बॅट उगारून फिर्यादी आणि त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.