संभाजीनगरमध्ये ऐन दिवाळीच्या तोंडावर चिमुकली कोरोना पॉझिटिव्ह;  जिल्हा आरोग्य यंत्रणेत खळबळ

एकीकडे सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु असताना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर शहरात चार वर्षीय चिमुकलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली.

    संभाजीनगर : एकीकडे सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु असताना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर शहरात चार वर्षीय चिमुकलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Little Child Corona Positive) आढळून आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरामध्ये राहणाऱ्या एका चार वर्षीय मुलीला कोरोना झाल्याने आता तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. एका खाजगी रूग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे.

    महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने चिमुकली उपचार घेत असलेल्या खाजगी रुग्णालय गाठले. तसेच या चिमुकलीच्या पालकांची चाचणी केली. सोबतच तिच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहितीसह इतर माहिती घेण्यात आली. मात्र, चिमुकलीच्या पालकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आता चिमुकलीला कोरानाची लागण झालीच कशी, असा प्रश्न निर्माण होत असून, त्यादृष्टीने आरोग्य विभाग आता कामाला लागला आहे.

    आरोग्य विभाग ‘अलर्ट’वर; नागरिकांनी घाबरु नये

    मागील वर्षभरापासून कोरोना हद्दपार झाला होता. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, शनिवारी चार वर्षीय चिमुकलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, एकीकडे दिवाळीचा सण तोंडावर आहे. अशात शहरात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे.