जळगाव : घोडसगावजवळ भरधाव वेगाने आलेल्या ट्रकची टँकर व क्रेनला धडक; अपघातात पाच ठार

राष्ट्रीय महामार्गावर घोडसगावपासून दोन किलोमीटर अंतरावर काल रात्री धुळ्याहून दूध घेऊन चाललेला टँकर अचानक बंद पडला. यामुळे टँकरच्या मालकाने दुसरा टँकर बोलावून यात दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू केले. यासाठी एक क्रेन देखील बोलावण्यात आली. यानुसार दुध शिफ्ट करण्याचे काम सुरू असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या टाईल्सने भरलेल्या ट्रकने दोन्ही टँकर्स आणि क्रेनला धडक दिली.

    मुक्ताईनगर : बंद पडलेल्या टँकरमधून (Tanker) दुसऱ्या टँकरमध्ये दूध (Milk) भरत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने या टँकर व क्रेनला (Crane) धडक दिल्याने (Accident) पाच जण जागीच ठार झाले. अशी माहिती पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी दिली.

    राष्ट्रीय महामार्गावर घोडसगावपासून दोन किलोमीटर अंतरावर काल रात्री धुळ्याहून दूध घेऊन चाललेला टँकर अचानक बंद पडला. यामुळे टँकरच्या मालकाने दुसरा टँकर बोलावून यात दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू केले. यासाठी एक क्रेन देखील बोलावण्यात आली. यानुसार दुध शिफ्ट करण्याचे काम सुरू असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या टाईल्सने भरलेल्या ट्रकने दोन्ही टँकर्स आणि क्रेनला धडक दिली. यात बंद पडलेल्या टँकरमधील तीन जण, टँकरचा धुळ्यावरून आलेला मालक आणि अजून एक जण अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

    पहाटे सुमारे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. दरम्यान, ट्रकने धडक दिल्यानंतर ट्रकच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र त्याचा पाठलाग करून पुढील एका ढाब्यावरून त्याला ताब्यात घेतले. त्याचा जबाब घेऊन गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह हे मुक्ताईनगरच्या उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. सर्व मयत हे धुळे जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचेही पोलीस निरिक्षक शंकर शेळके यांनी सांगितले.

    दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घोडसगाव येथील पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मदत केली. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ही काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली आहे.