उल्हास नदी संवर्धनासाठी एक पाऊल

    शहराच्या मध्यवर्ती ठिकाणाहून वाहणारी उल्हास नदी कर्जत करीता जीवनदायिनी आहे. त्यामुळे तिचे सौंदर्य टिकवणे, तिचे संवर्धन करणे करणे गरजेचे आहे. याकरिता आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून नदी संवर्धन करीता एक पाऊल पुढे टाकले असून जेसीबी मशीनच्या माध्यमातून नदीमधील झाडेझुडपे काढण्यास सुरुवात केली आहे.

    उल्हास नदीमधील गाळ काढण्यात आल्यानंतर कर्जत शहराला पावसाळ्यात होणारा महापुराचा त्रास कमी झाला होता. त्याला १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर गतवर्षी जुलै महिन्यात अचानक कर्जत शहरात उल्हास नदीला आलेल्या महापुरचे पाणी शिरले. दहीवली, मुद्रे आणि कर्जत शहर भागात शिरलेल्या पाण्याने मोठे आर्थिक नुकसान केले होते. त्यामुळे उल्हास नदीमधील गाळ काढून पाण्याचा प्रवाह वेगाने खाली झाला पाहिजे आणि नदीमधील झाडेझुडपे यामुळे पाण्याचा निचरा होत नव्हता. ही बाब लक्षात येताच आमदार थोरवे यांनी उल्हास नदीमधील गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली आहे.

    या कामामुळे उल्हास नदी पुन्हा एकदा गाळमुक्त आणि प्रदूषण कमी होऊन संवर्धनदेखील होणार आहे. उल्हास नदीवरील श्रीराम पूल खालच्या आणि वरच्या भागात नदी पात्रात प्रवाहात वाढलेली झाडी झुडपांची साफसफाई करण्याचे काम सुरू केले आहे.