सातव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शिकवणीला जाण्यासाठी निघाला होता घरातून अन्…

इमारतीच्या सातव्या माळ्यावरून खाली उडी घेऊन एका विद्यार्थ्याने आत्महत्या (Student Suicide) केली. ही घटना मानकापूर पोलिस ठाण्यांतर्गत घडली. मोईन शेख नौशाद शेख (वय 19, रा. संजीवनी सोसायटी, गणपतीनगर) असे मृताचे नाव आहे.

    नागपूर : इमारतीच्या सातव्या माळ्यावरून खाली उडी घेऊन एका विद्यार्थ्याने आत्महत्या (Student Suicide) केली. ही घटना मानकापूर पोलिस ठाण्यांतर्गत घडली. मोईन शेख नौशाद शेख (वय 19, रा. संजीवनी सोसायटी, गणपतीनगर) असे मृताचे नाव आहे. मोईल बारावीनंतर नीट परीक्षेची (Student) तयारी करत होता. त्याचे वडील नौशाद हे वेकोलि सावनेर येथे नोकरीला आहेत. आई गृहिणी असून, त्याला एक लहान बहीणही आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी ही मोईन शिकवणी वर्गाला जाण्यासाठी घरून निघाला होता. रात्री 8 वाजताच्या सुमारास तो आपल्या घरापासून जवळपास दीड किमी अंतरावरील गोधनी रेल्वेच्या सत्यम अपार्टमेंटमध्ये गेला. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकानुसार, तो वाहन पार्क करून वर गेला आणि काही वेळातच खाली आला. काही क्षण खाली राहिल्यानंतर तो पुन्हा अपार्टमेंटमध्ये गेला. इमारतीच्या सातव्या माळ्यावर जाऊन त्याने खाली उडी घेतली. या घटनेची माहिती सोसायटीचे नागरिक आणि पोलिसांना दिली.

    मानकापूर पोलिस घटनास्थळावर पोहोचले. मोईनला उपचारार्थ मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. जवळ मिळालेले कागदपत्र आणि वाहनाच्या माध्यमातून त्याची ओळख पटली आणि कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. या घटनेचा शेख कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्याने अचानक इतके टोकाचे पाऊल का उचलले असेल असा प्रश्न त्यांना पडला आहे.