पैशाअभावी वडापाव न मिळाल्याने जिद्दीतून यशस्वी उद्योजिका; शर्वरी माणगावे यांनी उलगडला जीवनप्रवास

टेंपो विकत घेऊन स्वतः टेंपो चालवून अर्थार्जन सुरू केले, यातूनच उद्योजकतेकडे वाटचाल सुरू केली. हा जीवन प्रवास कोल्हापूर येथील उद्योजिका व रोलिंग स्टोन आईस्क्रीम पार्लरच्या संस्थापक शर्वरी माणगावे यांनी उलगडविला.

  बारामती : बहिणीसोबत सहज कोल्हापूर शहरात फिरायला गेल्यानंतर वडापावचा गाडा पाहून वडापाव खाण्याची तीव्र इच्छा झाली, वडापावची किंमत १० रुपये, मात्र जवळ फक्त सहा रुपये होते, त्यामुळे वडापाव खाता आला नाही. आपल्याकडे चार रुपये कमी असल्याने वडापाव खाता आला नाही, ही खंत रात्रभर लागली. यांनतर उसनवारी करून टेंपो विकत घेऊन स्वतः टेंपो चालवून अर्थार्जन सुरू केले, यातूनच उद्योजकतेकडे वाटचाल सुरू केली. हा जीवन प्रवास कोल्हापूर येथील उद्योजिका व रोलिंग स्टोन आईस्क्रीम पार्लरच्या संस्थापक शर्वरी माणगावे यांनी उलगडविला.

  शारदानगर (ता.बारामती)येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वयंसिद्धा युवती संमेलनातील सत्रात शर्वरी माणगावे यांची मुलाखत प्रा. स्वामीराज भिसे यांनी घेतली. शर्वरी यांना कुस्ती या प्रकारात यश मिळवायचे होते. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी कुस्ती खेळण्यास सुरुवात केली. वडिलांच्या प्रेरणेने कुस्ती प्रकारात नॅशनल पर्यंत खेळल्या. मुलीना जर कुस्ती प्रकारात पुढे जायचे असेल तर त्यांना अनेक अडचणीना तोंड दयावे लागते. मुख्य म्हणजे मुलीसाठी सराव करण्यास तालीमशाळा उपलब्ध नसतात, तरी जिद्द असेल तर त्या सहज पुढे जाऊ शकतात, असे त्या म्हणाल्या.

  शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द

  शैक्षणिक प्रवासाबद्दल त्या म्हणाल्या, शिक्षणांची मला आवडच नव्हती. तब्येत व केस हे मुलांसारखे असायचे त्यामुळे शाळेत सर्व चिडवयाचे आणि राग आल्यानंतर त्या मुलांना बेदम मारायच्या, नंतर अनेक तक्रारी माझ्या घरी यायच्या. कसेतरी मी १० वी च्या वर्गापर्यंत पोहचले. १० वीला एक विषय राहिला. अथक प्रयत्नानी तो सोडवला. त्यानंतर ११ वी पूर्ण केली. या वर्षी मी १२ वी चा फॉर्म भरलेला आहे. राहिलेले शिक्षण पूर्ण करायचेच ही माझी जिद्द आहे.

  मुलगी टेम्पो चालवते म्हणून झाली थट्टा

  आपला उद्योजिका होण्याच्या प्रवासाबद्दल त्या म्हणाल्या, उद्योजिका होण्याची सुरुवात एका घटनेमुळे झाली. एक दिवशी बहिणीसोबत त्या सहज कोल्हापूर शहरात फिरायला गेल्या. वडापावचा गाडा बघितल्यानंतर वडापाव खाण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण झाली. वडापाव दहा रूपयाला होता. त्यांच्याकडे फक्त सहा रुपये होते म्हणून यांना वडापाव खाता आला नाही. रात्रभर मी हाच विचार करीत होते की, आपल्याकडे चार रुपये कमी असल्यामुळे वडापाव खाता आला नाही, ही खंत मला रात्रभर लागून राहिली. दुसऱ्याच दिवशी पैसे कमवायचेच हा निर्धार केला आणि बहिणीला तसे बोलूनही दाखवले. नंतर काहीच दिवसात इकडून तिकडून पैशांची व्यवस्था केली आणि टेम्पो खरेदी केला. मुलगी टेम्पो चालवते म्हणून सर्वांनी थट्टा केली. मी टेम्पो चालवून अर्थाजन करण्यास सुरुवात केली.

  दरमहा पन्नास हजार रुपये उत्पन्न

  नंतर आईस्क्रीम पार्लर सुरु करायचे मनात आले. कोल्हापूरमध्ये रोलिंग स्टोन आईस्क्रीम पार्लर सुरु केले. हा व्यवसाय सुरु करताना अनेक अडचणीना तोंड दयावे लागले. खाऊ गल्लीतील लोकांनी आमचे वीज कनेक्शन तोडले. फक्त ठराविक वेळेत आईस्क्रीम पार्लर सुरु ठेवण्यास सांगितले. परंतु मी कधीही डगमगले नाही. आणि या क्षेत्रात नवीन स्वादांचे आईस्क्रीम तयार करायला सुरुवात केली. उदा. गाजर फ्लेवर, पुरणपोळी फ्लेवरचे आईस्क्रीम तयार केले. पहिल्या दिवशी ३०० रुपये मिळाले आणि आईवडीलांना खूप-खूप आनंद झाला. आज माझी कमाई दरमहा पन्नास हजार रुपये आहे.

  फुले, शाहू व आंबेडकर आदर्श

  एवढ्या पैशाचे तुम्ही काय करता? हा प्रश्न विचारल्यानंतर २१ वर्षीय शर्वरी माणगावे म्हणाल्या, दरमहा आई-वडिलांचा औषधांचा खर्च, घराचा खर्च आणि वडिलांनी घेतलेल्या घराचा हफ्ता भरण्यात सर्व पैसे खर्च होतात. आपण संपूर्ण कुटुंबाचा खर्च भागवू शकतो याचा मला अभिमान आहे. आजच्या युवतींना मला हेच सांगायचे आहे, “जे तुम्हाला आवडेल, जे तुम्हाला जमेल ते मनापासून, प्रामाणिकपणे करा. यश तुमचेच आहे. फुले, शाहू व आंबेडकर हे माझे आदर्श आहेत. शिवाय भारताचे प्रसिद्ध उद्योजक जमशेदजी टाटा आणि रतन टाटा यांच्याही कार्याचा आपल्यावर प्रभाव आहे. कार्यक्रमच्या शेवटी त्यांनी शिबिरार्थीना “घेणारे नाही, तर रोजगार देणारे व्हा” असा बहुमूल्य संदेश दिला.

  संस्थेच्या विश्वस्त सुनंदा पवार, सामाजिक कार्यकर्त्या सविता व्होरा, मुख्य कार्यकारी अधिकारी प्राचार्य निलेश नलावडे, संस्था समन्वयक प्रशांत तनपुरे, संस्थेच्या एचआर गार्गी, प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी, स्वयंसिद्धा युवती संमेलनाचे समन्वयक प्रा. राजकुमार देशमुख, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. रोहिदास लोहकरे, सायन्स विद्या शाखाप्रमुख डॉ. परिमिता जाधव, कला व वाणिज्य विद्याशाखाप्रमुख प्रा. आनंदराव कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. यशवंत डुंबरे संस्थेतील सर्व पदाधिकारी, विभागप्रमुख व प्राध्यापक आणि १५०० शिबीरार्थी उपस्थित होते.