
सिलेंडरच्या स्फोटातून निघालेल्या आगीच्या ठिणग्यांनी घरात ठेवलेले संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. या आगीत महत्त्वाची कागदपत्रेही जळून खाक झाली. वृद्ध जोडप्याने आरडाओरड केल्यानंतर शेजारी राहणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.
घाटंजी : तालुक्यातील चोरंबा येथे राहणाऱ्या वृद्ध राऊत दाम्पत्याच्या घरात गॅस सिलेंडरचा (LPG Cylinder Blast) स्फोट झाला. यामध्ये घरातील संपूर्ण साहित्यासह रोख रक्कम जळाल्याने वृद्ध दाम्पत्याचे मोठे नुकसान (Cylinder Blast) झाले.
तुकाराम राऊत हे त्यांच्या वृद्ध पत्नी कलावतीसोबत चोरंबा येथे राहतात. शनिवारी सकाळी कलावती राऊत यांनी अन्न शिजविण्यासाठी गॅस सिलेंडर सुरू केला. त्यानंतर गॅस सिलेंडर लिक झाल्यामुळे सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. गॅस सिलेंडरचा स्फोट होताच वृद्ध दाम्पत्य घरातून बाहेर आले आणि त्यांनी आपला जीव वाचविला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
सिलेंडरच्या स्फोटातून निघालेल्या आगीच्या ठिणग्यांनी घरात ठेवलेले संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. या आगीत महत्त्वाची कागदपत्रेही जळून खाक झाली. वृद्ध जोडप्याने आरडाओरड केल्यानंतर शेजारी राहणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लोकांनी घरातून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला.
तुकाराम राऊत यांना संतोष, गजानन आणि संजय अशी तीन मुले आहेत. तरीदेखील तुकाराम आणि कलावती त्यांच्या तीन मुलांपासून वेगळे राहत होते. या आगीत वृद्ध दाम्पत्याचे संपूर्ण साहित्य जळल्याने मोठे नुकसान झाले आहे.