A Three Day National Seminar on Vedic Commentators was Held in Vedic Research Board
A Three Day National Seminar on Vedic Commentators was Held in Vedic Research Board

  पुणे : वेदांशी संबंधित संशोधनाचे कार्य करणारी वैदिक संशोधन मंडळ ही पुण्यातील एक अग्रगण्य संस्था असून,  संस्थेने ९५ वर्षे हे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे. वेदांची मौखिक परंपरा जरी प्रचलित असली तरी वेदार्थ जाणून घेण्यासाठी महत्त्वाचे असणारे भाष्यग्रंथ सर्वांना माहिती नाहीत. या भाष्यांची रचना करणारे कित्येक भाष्यकार अभ्यासकांनाही अज्ञात आहेत.

  वेदमंत्रांसह दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ

  वेदभाष्यकार या विषयावर एक चर्चासत्र वै.सं.मंडळाने दिनांक ११ ते १३ डिसेंबर २०२३ या कालावधीत आयोजित केले होते. वेदमंत्रांसह दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. एकूण ३० संशोधक, विद्यार्थी अभ्यासक आणि प्राध्यापक यात सहभागी झाले होते. अनन्ताचार्य, सायणाचार्यांसारखे प्राचीन भाष्यकार तसेच वरदानंदभारती, स्वामी राधिकानंद, अरविंदाचार्य अशा अर्वाचीन भाष्यकारांबरोबरच विंटरनिटझ, मैक्समूलर, हिलेब्रांड, ओल्डेनबर्ग, ल्युडर्स इत्यादी पाश्चात्य विद्वानांचेही योगदान या चर्चासत्रामुळे अभ्यासकांसमोर आले. या चर्चासत्रात महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूरबरोबरच राजस्थान, आंध्र प्रदेश, प.बंगाल, केरळ इत्यादी राज्यांतील अनेक वेदमूर्ती व आधुनिक संशोधकांनी भाग घेतला.

  वेदप्रकाश उपाध्याय यांच्या हस्ते मंडळाची दोन पुस्तके

  वै.सं. मंडळाच्या आदर्श शोध संस्था-प्रबंधन समितीचे अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित प्राध्यापक वेदप्रकाश उपाध्याय यांच्या हस्ते मंडळाची दोन पुस्तके प्रकाशित झाली. मंडळाचे निदेशक डॉ. सुब्रह्मण्यम् वीरिवेंटी दोन्ही पुस्तकांचे मुख्य संपादक असून त्यातील एक पुस्तक डॉ. भाग्यश्री-भागवत-लिखित A Descriptive Catalogue : History and Development आणि दुसरे पुस्तक फेब्रुवारी २०२३ मध्ये मंडळात पार पडलेल्या चर्चासत्रातील शोध निबंधांचा संग्रह Publication of VSM हे होय.

  वेगवेगळ्या भाष्यांची आवश्यकता

  डॉ. मंजूश्री कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी, उपमुख्यमंत्री कार्यालय, महाराष्ट्र शासन या उपस्थित होत्या. “भाष्यकारांसाठी अर्थकामना महत्त्वाची असते. आपण ज्या दृष्टीने बघू शकत नाही त्या दृष्टीने भाष्यकार बघतात. बदलत्या काळानुसार वेगवेगळ्या भाष्यांची आवश्यकता आहे.” शंकराचार्यन्यास या नाशिकस्थित संस्थेचे अध्यक्ष डॉ. आशिष कुलकर्णी यांनी या ज्ञानसत्राला शुभेच्छा दिल्या. समारोप प्रसंगी, “आधुनिक काळात संशोधनही परंपरेबरोबर तेवढेच महत्त्वाचे आहे,” असे मत वेदमूर्ती नरेंद्र कापरे यांनी व्यक्त केले.

  वेद भाष्यकारांचा अभ्यास निश्चितच उपयोगी

  चर्चासत्राच्या विषयामुळे संशोधनासाठी नवीन दार उघडल्याचेही त्यांनी सांगितले. मंडळाच्या प्रबंधनसमितीच्या अध्यक्ष डॉ. सरोजा भाटे यांनी “वेद भाष्यकारांचा अभ्यास निश्चितच उपयोगी असून संशोधकांनी त्यापलीकडे जाऊन नवीन दृष्टीने वेदांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावा,” असा संदेश दिला तर प्रा. विनया क्षीरसागर यांनी अशा चर्चासत्रांची उपयोगिता स्पष्ट केली.

  अर्थसहाय्याने हे चर्चासत्र पार पडले

  सेंट्रल संस्कृत युनिवर्सिटी दिल्ली आणि शंकराचार्य न्यास नाशिक यांच्या अर्थसहाय्याने हे चर्चासत्र पार पडले. डॉ. ओंकार जोशी यांनी चर्चासत्राच्या संयोजकाची जबाबदारी पार पाडली. या प्रसंगी कर्नाटक विश्वविद्यालयातील विभागप्रमुख डॉ. वीरनारायण पांडुरंगी, ज्येष्ठ वेदाभ्यासक प्रा. ग.उ.थिटे, प्रा. श्रीकांत बहुलकर आदी उपस्थित होते.