वाशीत सापडले तीन दिवसांच्या स्त्री जातीचे अर्भक

मोरे यांनी त्वरित वाशी पोलिसांची संपर्क साधला. वाशी पोलिसांना घटनेची माहिती मिळतात तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बाळाला ताब्यात घेतले.

    नवी मुंबई : गणपत मोरे हे दिघ्यातील रहिवासी मुंबईला काही कामानिमित्त जाण्यासाठी पनवेल सायन महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाशी हायवेच्या बस स्टॉपवर उभे होते. दरम्यान गणपत मोरे यांना लहान मुल रडत असल्याचा आवाज आल्याने मोरे हे आवाजाच्या दिशेने बस स्टॉपच्या मागील बाजूस गेले असता त्यांना तीन ते चार दिवसांचे स्त्री जातीचे बालक मिळून आले. मोरे यांनी त्वरित वाशी पोलिसांची संपर्क साधला. वाशी पोलिसांना घटनेची माहिती मिळतात तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बाळाला ताब्यात घेतले. बाळ लहान असल्याने बाळाला वाशीतील मनपा रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे.

    एक महिन्यानंतर बाळाला नेरुळ येथील बाल शिशुगृहाकडे सोपवले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदरचे बालक हे स्त्री जातीचे असल्याने मुलगा पाहिजे होता आणि मुलगी झाली म्हणून रस्त्यावर सोडले? अथवा हे बाळ अनैतिक संबंधातून झाल्याने रस्त्यावर सोडून दिले? याचा शोध पोलीस करीत आहेत. तसेच या बाळाबाबत काही माहिती मिळतात वाशी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक निवास शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.