खड्ड्यातील पाण्यात पडल्याने तीन वर्षीय मुलाचा मृत्यू

करंजाडे येथे इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पनवेल परिसरात इमारतींसाठी खोदलेले खड्डे जीव घेणे ठरत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

    पनवेल, ग्रामीण : इमारतीच्या बांधकामा करता खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून एका तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना करंजाडे वसाहतीत घडली आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रियान केशर खाडकी (रा. शंभूराजे अपार्टमेंट, प्लॉट 163, सेक्टर आर दोन, करंजाडे) असे मृत मुलाचे नाव आहे.

    करंजाडे येथे इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पनवेल परिसरात इमारतींसाठी खोदलेले खड्डे जीव घेणे ठरत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. रियान खाडकी हा खेळता खेळता निर्माणाधीन इमारतीच्या समोर असलेल्या खोदलेल्या खड्ड्यात पाण्यात जाऊन पडला. त्याचा शोध घेतला असता तो त्या ठिकाणी सापडून आला. त्याला उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. पनवेल तालुक्यात विविध ठिकाणी इमारतींचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक ठिकाणी नैनाची परवानगी न घेता इमारतींचे काम वेगाने सुरू आहे.

    विचुंबे, देवद, उसर्ली आदी भागात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरू आहे. इमारतींसाठी मोठमोठे खड्डे खोदले जातात. मात्र त्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेतली जात नाही. कोणतेही फलक अथवा पट्ट्या लावल्या जात नाही. सुरक्षारक्षकांची नेमणूक देखील केली जात नाही. इमारत बांधण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात २६ नोव्हेंबरला तीन वर्षीय मुलाचा याच खड्ड्यात पडून मृत्यू झाला. अशा अनेक घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत. त्यामुळे अशा बांधकाम व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.