रिक्षातच आली फिट, वाहतूक पोलिसांनी कर्तव्य सांभाळत वाचवला रिक्षाचालकाचा जीव

सिग्नलवर वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाला (Pune Traffic Police) रिक्षाचालक फिट आलेल्या अवस्थेत आढळला. हा रिक्षाचालक जागेवरच कोसळला. पण, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्या रिक्षाचालकावर तत्काळ उपचार मिळाले अन् त्याचा जीव वाचला आहे. रिक्षाचालकाने पोलिसांचे भरल्या डोळ्यांनी आभार मानले.

    पुणे : सिग्नलवर वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाला (Pune Traffic Police) रिक्षाचालक फिट आलेल्या अवस्थेत आढळला. हा रिक्षाचालक जागेवरच कोसळला. पण, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्या रिक्षाचालकावर तत्काळ उपचार मिळाले अन् त्याचा जीव वाचला आहे. रिक्षाचालकाने पोलिसांचे भरल्या डोळ्यांनी आभार मानले.

    पोलीस नाईक रविंद्र शेंडगे व पोलीस हवालदार सतीश सोनवणे असे या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी उत्तम कामगिरीमुळे कर्मचाऱ्यांना प्रशंसापत्र देऊन गौरविले आहे. उत्तम गायकवाड असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. उत्तम गायकवाड हे रिक्षाचालक आहेत. गेल्या आठवड्यात ते रिक्षाने परिहार चौकातून जात होते. यादरम्यान, पोलीस नाईक रविंद्र व सतीश सोनवणे वाहतूक नियमन करत होते. त्याचवेळी धावती रिक्षा अचानक थांबली. पाहिल्यानंतर रिक्षाचालकाला फिट आल्याचे दिसून आले.

    हे पाहिल्यानंतर लगेचच रविंद्र शेंडगे व सतीश सोनवणे यांनी येथे धाव घेतली. वर्दळीची वेळ असल्याने मोठी गर्दी जमली. कर्मचाऱ्यांना फिट आल्याचे लक्षात येताच रिक्षाचालकाला बाहेर काढले व चावीने त्याचे हात व पाय चोळले. दहा ते पंधरा मिनिट त्याला उपचार दिल्याने रिक्षाचालक पूर्ण शुद्धीवर आला. त्याला तत्काळ मदत मिळाल्याने पुढील अनर्थ टळला. त्याने वाहतूक पोलिसांचे आभार मानले. नागरिकांनी देखील पोलिसांच्या या कामाचे टाळ्या वाजवून कौतुक केले.