ऐन दिवाळीत पाण्याचा ठणठणाट! कोल्हापूरमध्ये जलअभियंत्यांच्या घरासमोर आंघोळ करून अनोखे आंदोलन

कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बालिंगा उपसा केंद्राचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने दिवाळीच्या तोंडावर पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने कोल्हापूर शहरात पाण्याचा ठणठणाट आहे. अधिकारी टँकरद्वारे केवळ कारभाऱ्यांचेच लाड पुरवत असल्याच्या कारणावरून सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह देसाई यांनी जलअभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या घरासमोर आंघोळ करून अनोखे आंदोलन केले.

  कोल्हापूर : कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बालिंगा उपसा केंद्राचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने दिवाळीच्या तोंडावर पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने कोल्हापूर शहरात पाण्याचा ठणठणाट आहे. अधिकारी टँकरद्वारे केवळ कारभाऱ्यांचेच लाड पुरवत असल्याच्या कारणावरून सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह देसाई यांनी जलअभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या घरासमोर आंघोळ करून अनोखे आंदोलन केले. कोल्हापूर शहराच्या उपनगरात अनेक प्रभागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मात्र अधिकारी केवळ मोजक्याच कारभाऱ्यांना दाद देऊन त्यांच्या प्रभागात पाणीपुरवठा करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
  गेल्या आठवडा भरापासून कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. बालिंगा उपसा केंद्रात दगड कोसळल्याने त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील प्रत्येक प्रभागात महापालिकेकडून टँकर आणि खासगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या आठवड्याभरापासून पाणी नसल्याने नागरिकांची ही गैरसोय झाली आहे.
  अशा परिस्थितीत प्रभागात टँकरची मागणी केल्यास टँकर सध्यातरी उपलब्ध नसल्याचे अधिकारी आणि कर्मचारी सांगतात. मात्र त्याला वैतागलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनाच धारेवर धरले आहे.  सकाळी सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई यांनी सरनोबत यांच्या घरासमोर जाऊन अनोखे आंदोलन केले.

  तुम्हाला या पदावर का बसवले?
  दारोदारी जाऊन पाण्याची भीक मागून त्यांनी सरनोबत यांच्या घरासमोर आंघोळ करत प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध व्यक्त केला. केवळ अधिकाऱ्यांचेच लाड पुरवण्यासाठी तुम्हाला या पदावर बसवले का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह देसाई यांनी केला.

   अधिकारी परस्पर टंॅकर पळवितात
  कोल्हापूर शहरातील ए वार्डात १०२ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ए वार्डमधील सर्वच प्रभागात पाणीपुरवठा केल्याचे अधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र अधिकारी परस्पर टँकर पळवत असल्याचे चित्र आहे. आपल्या प्रभागात पाणी कमी पडू नये, अशीच भूमिका कारभाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.