नातेवाईकांना फसवण्यासाठी मुलीचा असाही बळी, निर्दयी बापाला अटक

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा आम्ही त्याच्या फोनमध्ये आत्महत्येचा फोटो सापडला तेव्हा आम्ही त्या व्यक्तीची चौकशी केली आणि त्याने आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली

    नागपूर : नागपुरातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नातेवाईकांसोबत सुरू असलेल्या वादामुळे एका निर्दयी पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीला आत्महत्येचा बनाव करण्यास सांगितले आणि नतंर तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.

    कळमना येथे 6 नोव्हेंबर रोजी एक 16 वर्षीय तरुणी घराच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडली होती. तसेच तीने लिहीलेली सुसाईड नोटही सापडली. या सुसाईड नोट्सच्या आधारे पोलिसांनी तिची सावत्र आई, काका, काकू आणि आजी आजोबांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. मात्र तपासादरम्यान पीडितेच्या वडिलांच्या मोबाईलवरून या घटनेमागे वेगळचं षडयंत्र असल्याचं समोर आलं.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीच्या वडिलांचा मोबाईलची झडती घेतली तेव्हा त्यामध्ये पीडितेचे फोटो आणि व्हिडिओ सापडले, ज्यावरून त्या व्यक्तीने आपल्या मुलीला आत्महत्येचे नाटक करण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले.

    नातेवाईकांना धडा शिकवाण्याचा आरोपीचा प्लॅन

    आरोपीच्या मोबाईलमध्ये पीडितेचे फोटो आणि व्हिडिओ सापडले. आधी त्याने आपल्या मुलीला आत्महत्या केल्याचा बनाव करण्यास सांगितले होते. तसेच तिला काही सुसाईड नोटही लिहिण्यास सांगितले आणि त्यांच्या काही नातेवाईकांची नावेही लिहायला सांगितले. हे सर्व केल्यानंतर मुलीने गळ्यात फास बांधला आणि वडिलांच्या सांगण्यानुसार स्टूलवर उभी राहिली. यादरम्यान आरोपीने एक फोटो क्लिक केला होता. त्यानंतर त्या व्यक्तीने स्टूलला लाथ मारली आणि यामुळे मुलीचा गुदमरुन मृत्यू झाला, ही घटना घडली तेव्हा तिची 12 वर्षांची बहीणही तिथे होती.

    पोलिसांची केली दिशाभूल

    या घटनेनंतर आरोपी सोडून निघून गेला.  पेलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने स्टेशनला फोन केला आणि आपण काही कामानिमित्त बाहेर होतो आणि  घरी परतल्यावर आपल्या मुलीने गळफास घेतल्याचे आढळल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी सुरुवातीला पाच नातेवाईकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. पण त्यानंतर तपासादरम्यान अनेक बाबींचा उलगडा झाला.

    पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा आम्ही त्याच्या फोनमध्ये आत्महत्येचा फोटो सापडला तेव्हा आम्ही त्या व्यक्तीची चौकशी केली आणि त्याने आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. त्यांच्या पहिल्या पत्नीचे 2016 मध्ये निधन झाले आणि दुसरी पत्नीही घर सोडून गेली. मजुरीचे काम करणाऱ्या या व्यक्तीला आता हत्येप्रकरणी अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.