आठही मुलीच झाल्या म्हणून पती करायचा छळ; संतप्त पत्नीने पतीसोबत केलं असं काही…

आठही मुलीच झाल्‍याने पती छळ करत होता. तसेच त्‍याने दुसरे लग्‍न करण्‍याची तयारीही केली होती. यामुळे संतापलेल्‍या पत्‍नीने आपल्‍या पतीवर विषप्रयोगाचा प्रयत्‍न केला. मात्र, तो सतत फसल्याने पतीचा खून करण्‍यासाठी तिने दोन लाखांची सुपारी दिली.

  पिंपरी : आठही मुलीच झाल्‍याने पती छळ करत होता. तसेच त्‍याने दुसरे लग्‍न करण्‍याची तयारीही केली होती. यामुळे संतापलेल्‍या पत्‍नीने आपल्‍या पतीवर विषप्रयोगाचा प्रयत्‍न केला. मात्र, तो सतत फसल्याने पतीचा खून करण्‍यासाठी तिने दोन लाखांची सुपारी दिली. सराईत गुन्‍हेगारांनी पतीवर खुनी हल्‍ला केल्‍यावर अवघ्‍या आठ तासांत निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

  शिवम दुबे ऊर्फ दुब्‍या आणि अमन पुजारी (दोघेही रा. पंचतारानगर, आकुर्डी) आणि जखमीची पत्‍नी या तिघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी जखमी व्यक्तीच्या मुलीने निगडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी महिलेला आठ मुलीच झाल्‍या. या कारणावरून तिचा पत छळ करत होता. तसेच त्‍याने दुसरे लग्‍न करण्‍याची तयारीही केली होती. यामुळे संतापलेल्‍या पत्‍नीने त्‍याचा काटा काढण्‍याचे ठरविले. सुरूवातीला तिने आपल्‍या पतीवर विषप्रयोग करण्‍याचे ठरविले. मात्र, पती सावध असल्‍याने वेळोवेळी तिचा हा प्रयोग फसला.

  महिलेच्या पतीवर तलवारीने सपासप वार

  त्‍यानंतर तिने शेजारी राहणारा सराईत गुन्‍हेगार अमन पुजारी याला दोन लाख रुपयांची पतीच्‍या खुनाची सुपारी दिली. या कामासाठी त्‍याने आपला मित्र शिवम दुबे याला सोबत घेतले. सुपारी मिळालेल्‍या पैशातून त्‍यांनी तलवारीही खरेदी केल्‍या. 7 डिसेंबर रोजी रात्री पती दारू पिऊन झोपल्‍याचे पत्‍नीने आरोपींना सांगितले. त्‍यानंतर घरात घुसून आरोपींनी पतीवर तलवारीने सपासप वार केले. पती मृत झाल्‍याचे समजून आरोपी तेथून निघून गेले.

  पत्नीनेच सुपारी दिल्याचे तपासात उघड

  घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी तपासाला सुरवात केली. आसपासच्‍या परिसरातील सीसीटीव्‍ही फुटेजची पाहणी केली असता पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण यांनी आरोपी अमन याला ओळखले. त्‍याला ताब्‍यात घेऊन चौकशी केली असता त्‍याने आपला साथीदार दुबे याचे नाव सांगितले. त्‍यानुसार पोलिसांनी त्‍यालाही अटक केली. या दोघांकडे चौकशी केली असता जखमी व्‍यक्‍तीच्‍या पत्‍नीनेच आपल्‍याला सुपारी दिल्‍याचे सांगितले. त्‍यानुसार पोलिसांनी पत्‍नीला अटक केली असता तिने गुन्‍ह्याची कबुली दिली.