पतीच्या अपघाती निधनानंतर पत्नीनेही घेतला जगाचा निरोप; उपचारादरम्यान मृत्यू

पातूर-अकोला मार्गावरील एमएसईबी पॉवर हाउसच्या पुलासमोरील डाव्या बाजूस असलेल्या अत्तरकार यांच्या शेताजवळ एक अपघात (Akola Accident) झाला. यामध्ये दुचाकीस्वार पतीचा यापूर्वीच मृत्यू झाला होता. तर आता जखमी पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  पातूर : पातूर-अकोला मार्गावरील एमएसईबी पॉवर हाउसच्या पुलासमोरील डाव्या बाजूस असलेल्या अत्तरकार यांच्या शेताजवळ एक अपघात (Akola Accident) झाला. यामध्ये दुचाकीस्वार पतीचा यापूर्वीच मृत्यू झाला होता. तर आता जखमी पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने अकोलासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  पती, पत्नी दोघेही दुचाकीने (क्र. एमएच 30 एड़ी 3054) शेतातून घरी परतताना समोरून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने जबर धडक दिली होती. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ 108 अॅम्बुलन्सच्या साहाय्याने अकोला येथे हलविले होते. मात्र, उपचारादरम्यान पुंडलिक निमकंडे (70) यांचा यापूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर पत्नी रत्नाबाई निमकंडे (65) यांचाही मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोक व्यक्त होत आहे.

  दोघेही अपघातस्थळावरून सुमारे 25 ते 30 फूट दूर फेकले गेल्याचे दिसून आले. दुचाकीला एका पिशवीमध्ये हरतालिकेचे सामान व पांढरी टोपी तसेच चपला व रक्त सांडलेले घटनास्थळावर आढळले. जखमींना रग्णवाहिकेच्या सहाय्याने प्रथम जिल्हा सर्वोपचार रुग्णालय व तेथून खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.

  सोमवारी दुपारी दोनला त्यांच्या पार्थिवावर स्मशानभूमीत हजारोंच्या उपस्थितीत टाळमृदंगाच्या गजरात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेचा पंचनामा सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन तडसे, शेगावकर, आसोलकर, केकण आदींनी केला.

  बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज

  पातूर अकोला मार्गावर शिर्लापासून एमएससीबी पॉवर हाऊस पातूरपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी कुठेही मधातून रस्ता नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होते. येताना विरुद्ध बाजूनेच यावे लागते. त्यामुळे या महामार्गावर शेतकऱ्यांसाठी मधात रस्ता असणे गरजेचे आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने व संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.