विमानातच डॉक्टर महिलेचा विनयभंग; संतप्त झालेल्या डॉक्टरने आरोपीची कॉलर धरली अन्…

विमानातील एका प्रवाशाने लँडिंगदरम्यान बाजूच्या सीटवर बसलेल्या महिला सहप्रवाशाचा विनयभंग (Molestation in Flight) केला. ही खळबळजनक घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली.

    नागपूर : विमानातील एका प्रवाशाने लँडिंगदरम्यान बाजूच्या सीटवर बसलेल्या महिला सहप्रवाशाचा विनयभंग (Molestation in Flight) केला. ही खळबळजनक घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी पीडित 40 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

    फिरोज शेख नूर मोहम्मद शेख (32) रा. दुर्रानी कॉम्प्लेक्स, मिठानगर, कोंडवा पुणे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो अभियंता असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही डॉक्टर असून, पुणेच्या एका मोठ्या रुग्णालयात नोकरी करते. तिला माहेरी चंद्रपूरला जायचे असल्याने सोमवारी पुणे-नागपूर विमानात बसली. तिच्या बाजूच्या सीटवर आरोपी फिरोज शेख बसला होता. तो बराच वेळ तिच्याकडे बघून अश्लील इशारे करत होता. मात्र, डॉक्टरने दुर्लक्ष केले. त्यानंतर त्याने मोबाईल समोर ठेवून अश्लील चित्रफिती आणि छायाचित्र बघणे सुरू केले.

    महिला डॉक्टरने कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने त्याची हिंमत वाढली. त्याने तिच्या पाठीला स्पर्श केला. विमानातून खाली उतरताना तिच्याशी अश्लील चाळे करत मोबाईल नंबर मागितला. चिडलेल्या महिलेने त्याची कॉलर धरली आणि विमानाबाहेर खेचले.

    सीआयएसएफच्या जवानांना घटनेची माहिती दिली. जवानांनी त्याला ताब्यात घेऊन सोनेगाव पोलिसांना सूचना दिली. सोनेगाव पोलिस घटनास्थळावर पोहोचले. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून आरोपी फिरोजला अटक केली.