कुटुंबातील महिला ही एखाद्या विद्यापीठासारखी असते ; आमदार रोहित पवार यांचे प्रतिपादन

कुटुंबातील महिला ही एखाद्या विद्यापीठा सारखी असते, असे प्रतिपादन कर्जत-जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी केले.शारदानगर (ता. बारामती) येथे स्वयंसिद्धा युवती संमेलन शनिवार (दि.१९) रोजी अप्पासाहेब पवार सभागृहात पार पडले. यावेळी आमदार रोहित पवार यांनी मार्गदर्शन केले.

  बारामती: कुटुंबातील महिला ही एखाद्या विद्यापीठा सारखी असते, असे प्रतिपादन कर्जत-जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी केले.शारदानगर (ता. बारामती) येथे स्वयंसिद्धा युवती संमेलन शनिवार (दि.१९) रोजी अप्पासाहेब पवार सभागृहात पार पडले. यावेळी आमदार रोहित पवार यांनी मार्गदर्शन केले.

  यावेळी आमदार रोहित पवार यांनी सहभागी विद्यार्थिनींना मी तुमचा भाऊच आहे. तुम्ही सर्वजण कार्यक्रमास आलात तुमचे मनापासून आभार, असे सांगून त्यांनी मी जास्तीत जास्त वास्तव बोलतो. उपस्थित युवतींना, विद्यार्थीनीना त्यांनी अनेक प्रश्न विचारले. आई वडील काय करतात? तुम्ही पुढे काय करणार आहात. ते म्हणाले, घरात आईची भूमिका महत्वाची असते. एकाच वेळी मुलगी मुलगी, पत्नी, आई व आजी इत्यादी भूमिका बजावाव्या लागतात. घरातील महिलाही एका विद्यापीठासारखी असते. मुलींनो तुमच्या सारखी क्षमता कोणामध्येही नाही. आई-वडील कमी शिकलेले असले तरी ते प्रामाणिकपणे तुम्हाला शिकवतात हे महत्त्वाचे. आई-वडिलांना वाटते की घर बांधावे, घरात अनेक वस्तू आणाव्यात, पण ते आपल्या इच्छा-आशा-आकांक्षांना मर्यादा घालतात, कारण तुमच्या शिक्षणासाठी आपल्या आधीच्या पिढीला खूप कष्ट करावे लागले. अनेक चांगले व्यक्ती, अधिकारी या संमेलनात येऊन गेले त्यांचे विचार तुम्ही ऐकले, त्यावर विचार करा. त्यातून बोध घ्या. या वयात आपले रोलमॉडेल फार वेगळे असतात. मैत्रीण प्रेमात पडली म्हणून आपणही प्रेमात पडले पाहिजे हे चुकीचे. आंधळ प्रेम काही कामाचं नसतं. शिक्षण घेत असताना फक्त शिका, अभ्यास करा, तुमचे स्वप्न तुमच्या आई वडिलांचे स्वप्न असते हे लक्षात घ्या.  महाविद्यालयीन काळानंतर आपल्याला वास्तव जगात जगावे लागते. त्याचे सोंग करता येणार नाही.

  प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्यामध्ये काही तरी वेगळेपणा पाहिजे.  महाविद्यालयीन जीवनात मुला-मुलींनी एकमेकांशी मोकळ्या व स्वच्छ मनाने बोलले पाहिजे व वास्तव प्रांजळपणे स्वीकारले पाहिजे. प्रेमभंगानंतर आत्महत्या हा पर्याय नाही. तुमच्या आत्महत्येने प्रश्न संपत नाहीत तर तुमच्यानंतर तुमच्या कुटुंबाला त्याचे परिणाम भोगावे लागतात.  उद्याचा महाराष्ट्र युवतींनो तुम्ही घडविणार आहात. एखाद्या समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील महिलेची प्रगती मोजा असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे.

  -महाराष्ट्रात २४ महिला आमदार
  अनेक राज्यांमध्ये ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित आहेत. ५४ टक्के महिलांमध्ये ॲनिमिया हा आजार आढळतो. २८८ आमदारांपैकी महाराष्ट्रात २४ महिला आमदार आहेत. आपल्या पुढे खूप अनेक आव्हाने आहेत. परिवर्तन जर घडवायचे असेल तर खूप काम करावे लागेल. व्यवसायिकच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही खूप काम करावे लागेल. राज्यात मुलींचा जन्मदर घटलेला आहे. ही गंभीर बाब आहे. पवारसाहेबांच्या प्रयत्नामुळे १९९३ मध्ये महिला आयोगाची स्थापना झाली. मी जेव्हा जातो तेव्हा ग्रामीण भागात जातो, तेव्हा तेथील महिलांशी चर्चा करतो तेव्हा मला तेथील खरे प्रश्न समजतात. वडिलांच्या संपत्ती (पवारसाहेबांच्या प्रयत्नामुळे) तुमचा निम्मा वाटा आहे.

  आयुष्यात जर तुमचे आई-वडील जा लढ असे म्हटले, तर इतरांचा विचार करू नका सकारात्मक रहा, तुम्हीच काही तरी वेगळं घडू शकता, आदिशक्तीचं तुम्ही प्रतीक आहात. आपल्यांच्या विरोधात तुम्हालाच आवाज उठवावा लागेल, हा तुमचा अधिकार आहे. तुम्हाला जे योग्य वाटतं तेच करा. तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. मार्गदर्शनानंतर विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अतिशय समर्पक उत्तरे दिली. यशाने हवेत जाऊ नका, सातत्य टिकवा हवेत जाल तर एक ना एक दिवस आपटाल असे त्यांनी युवतींना सांगितले.

  कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, प्रमुख पाहुणे इंद्रजित देशमुख, विश्वस्त सुनंदा पवार, सामाजिक कार्यकर्त्या सविताताई व्होरा, मुख्य कार्यकारी अधिकारी प्राचार्य निलेश नलावडे, संस्था समन्वयक  प्रशांत तनपुरे, संस्थेच्या एचआर गार्गी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी, स्वयंसिद्धा युवती संमेलनाचे समन्वयक प्रा. राजकुमार देशमुख, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. रोहिदास लोहकरे, कला व वाणिज्य विद्याशाखाप्रमुख प्रा. आनंदराव कदम, सायन्स विद्याशाखाप्रमुख डॉ. परिमिता जाधव, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. यशवंत डुंबरे संस्थेतील सर्व पदाधिकारी, विभागप्रमुख व सर्व प्राध्यापक आणि सहभागी सर्व स्वयंसिद्धा संमेलनासाठी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आश्लेषा मुंगी व प्रा. स्वामीराज भिसे यांनी केले.