क्रेडीट कार्डचा प्लॅन बंद करण्याच्या बहाण्याने फसवणूक; महिलेला सायबर चोरट्यांनी घातला साडे नऊ लाखांना गंडा

क्रेडीट कार्डधारक महिलेला सायबर चोरट्यांनी साडे नऊ लाखांचा गंडा घातला असून, क्रेडीट कार्डचा प्रोटेक्शन प्लॅन डिसेबल करण्याचा बहाणा करून महिलेकडून गोपनीय माहिती घेत ही रक्कम ऑनलाईनरित्या उकळण्यात आली आहे.

    पुणे : क्रेडीट कार्डधारक महिलेला सायबर चोरट्यांनी साडे नऊ लाखांचा गंडा घातला असून, क्रेडीट कार्डचा प्रोटेक्शन प्लॅन डिसेबल करण्याचा बहाणा करून महिलेकडून गोपनीय माहिती घेत ही रक्कम ऑनलाईनरित्या उकळण्यात आली आहे.

    याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात ३९ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, अनोळखी मोबाईल धारक व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या नोकरी करतात. दरम्यान, त्यांच्याकडे एका खासगी बँकेचे क्रेडिट कार्ड आहे. एक दिवस त्यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला व त्यांना मी संबंधित बँकेच्या क्रेडीट कार्ड विभागातून बोलत असल्याची बतावणी केली. तसेच, त्यांना क्रेडीट कार्डचे प्रोटेक्शन प्लॅन डिसेबल करण्यासाठी कॉल केल्याची माहिती देत त्यांना यासाठी एक लिंक पाठविली. त्यात माहिती भरून देण्यास सांगितले.

    तक्रारदारांनी लिंक ओपन करून त्यात पुर्ण माहिती भरली. त्यात क्रेडीट कार्डची देखील माहिती देण्यात आली होती. ती माहिती भरताच ऑनलाईनरित्या तक्रारदार यांच्या क्रेडीट कार्डमधून ९ लाख ५५ हजार २३७ रुपये घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.