
मंडई बघण्यासाठी गेलेल्या एका 17 वर्षीय तरुणीचा 15 ते 16 टवाळखोरांनी विनयभंग केल्याचा प्रकार बेटाळा येथे उघडकीस आला. याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी आठ तरूणांविरूद्ध गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
भंडारा : मंडई बघण्यासाठी गेलेल्या एका 17 वर्षीय तरुणीचा 15 ते 16 टवाळखोरांनी विनयभंग केल्याचा प्रकार बेटाळा येथे उघडकीस आला. याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी आठ तरूणांविरूद्ध गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. घटनेच्या रात्री पीडित तरुणी ही गावातच मंडई बघण्यासाठी गेली होती.
मध्यंतरात ही तरुणी व तिचा आतेभाऊ बाहेर रस्त्यावर असताना 15 ते 16 तरुण त्यांच्याजवळ येऊन त्या दोघांनाही मारहाण करू लागले. यावेळी या तरुणांनी तिच्या हातापायाला, पोटाला, छातीला हातापाय व काठीने बेदम मारहाण केले. यात ती गंभीररित्या जखमी झाली आहे. तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अभिमान चैताराम (२४), कैलास रामकृष्ण देशमुख (२८), शोभाराम सेवक साकुरे (३३) सह आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सदर पीडित तरूणी ही प्रचंड घाबरलेली आहे. 15 ते 16 आरोपींनी काठीने बेदम मारहाण केली. यातील काही जणांना ती ओळखत असल्यामुळे पोलिसांना नावे सांगितली. त्यावरून पोलिसांनी त्या तरूणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार करू नका, असा दबाव तिच्या कुटुंबावर आणला जात असल्याचे पीडितेच्या आईने सांगितले. याप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणीही पीडितेने केली आहे.