नागपुरात झुडूपात आढळला तरुणाचा मृतदेह; परिसरात एकच खळबळ

गेल्या काही दिवसांपासून शहरात हत्याकांडाचे सत्र सुरू आहे. या घटनांनी नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरत चालले आहे. कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत असल्याने पोलिस विभागाचीही डोकेदुखी वाढली आहे.

    नागपूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात हत्याकांडाचे सत्र सुरू आहे. या घटनांनी नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण (Crime in Nagpur) पसरत चालले आहे. कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत असल्याने पोलिस विभागाचीही डोकेदुखी वाढली आहे. बुधवारी रात्री एमआयडीसी ठाण्यांतर्गत (MIDC Police) राकेश मिश्राच्या खुनाचा तपास सुरू असतानाच गुरुवारी सकाळी अजनी ठाण्यांतर्गत राजर्षीनगर परिसरात काटेरी झुडूपांमध्ये एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

    घटनास्थळ आणि मृतदेहाची स्थिती पाहून खुनाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, सध्या पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. मृताची ओळख अद्यापही पटलेली नाही. या तरूणाचे अंदाजे वय 35 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे.

    या परिसरात दुर्गंध येत होता. परिसरात शोध घेतला असता काही लोकांना झुडूपांमध्ये एक मृतदेह दिसला. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. अजनीचे ठाणेदार नितीन फटांगरे पथकासह घटनास्थळावर पोहोचले. डीसीपी गुन्हे मुमक्का सुदर्शन आणि युनिट 4 चे पोलिस निरीक्षक श्याम सोनटक्केही घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता. अर्धे शरीर सडलेले होते आणि काही भाग जनावरांनी खाल्ला होता. जंगली झुडूपात इतके काटे होते की, मृतदेहापर्यंत पोहोचणे खूपच कठीण होते.

    पोलिसांनाही मृतदेहापर्यंत पोहोचण्यासाठी आधी मजुरांच्या मदतीने झुडूपांची सफाई करावी लागली. दरम्यान, मृत्यू होऊन किमान 4-5 दिवस झाल्याने ओळख पटविणे कठीण झाले आहे. त्यामुळे खुनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.