झाडाची फांदी डोक्यात पडल्याने तरुणाचा मृत्यू ; ओंकारेश्वर मंदिर परिसरातील धक्कादायक घटना

- टपरीवर चहा पिण्यासाठी आल्यानंतर घडली दुर्दैवी घटना

    पुणे : ओंकारेश्वर मंदिर परिसरात टपरीवर चहा पिण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा चहा पिताना अचानक झाडाची फांदी डोक्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. तरुण पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. मात्र, काळाने त्याच्यावर घाला घातला. त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे.अभिजित गुंड (वय ३२ रा. कसबा पेठ, मुळ. ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

    अभिजित मुळचा बाहेर शहरातील आहे. तो गेल्या काही वर्षांपासून पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. तो कसबा पेठेत मित्रांसोबत भाड्याने खोलीकरून रहात होता. त्याचा भाऊ परदेशात असतो. तर, त्याला आई-वडिल नाहीत. नातेवाईक देखील पुण्यात नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

    मिळालेल्या माहितीनुसार, ओंकारेश्वर मंदिर परिसरात रविवारी सायंकाळी अभिजित चहा पिण्यासाठी येथील टपरीवर आला होता. मित्रांसोबत चहा पित तो झाडाच्या खाली उभारलेला होता. त्याचदरम्यान अचानक झाडाची वाळलेली फांदी अभिजितच्या डोक्यात पडली. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी येथे धाव घेतली. पुढील तपास विश्रामबाग पोलीस करीत आहे.

    दरम्यान, शहरात दोन दिवसांपासून सुसाट वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडत असून, अधून-मधून विजांचा कडकडाट देखील होत आहे. दुसरीकडे पावसाळ्यात पालिकेकडून धोकादायक झाडे व त्याच्या फांद्या कापण्याचे काम केले जाते. त्यामुळे या घटनेत अभिजितच्या मृत्यूला विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालयाचे तसेच गार्डन विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. संबंधित सर्व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अभिजित गुंड याच्या मित्रांनी केली आहे.