
बदनापूर/जालना : सरकारला ४० दिवसांची मुदत देऊन देखील त्यांनी आरक्षण दिले नाही, असे चिठ्ठीत नमूद करून बाजार गेवराई (ता. बदनापूर) येथील जयराम भिकाजी कान्हेरे या तरुणाने मंगळवारी (ता. २४) रात्री आपल्या शेतात विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
प्रकृतीत सुधारणा
ही घटना निदर्शनास येताच ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथे खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती माजी सरपंच सुरेश लहाने यांनी दिली आहे.
मराठा आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय सहभागी
बाजार गेवराई येथील जयराम भिकाजी कान्हेरे हे मराठा आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय सहभागी असतात. मराठा आरक्षण जाहीर करण्याची सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत २४ ऑक्टोबर रोजी संपली. मात्र सरकारने मराठा आरक्षण दिले नाही, याचा राग होता. एकूणच या कारणामुळे त्यांनी आपल्या शेतात जाऊन मंगळवारी (ता. २४) रात्री विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
सुसाईड नोटमध्ये सांगितले कारण
यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी दिलेली मुदत संपल्यानंतर देखील सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत कुठलेच पाऊल उचलले नाही, त्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे स्पष्ट केले.
सुरुवातीला त्यांची प्रकृती गंभीर
दरम्यान, ही घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला त्यांची प्रकृती गंभीर होती. मात्र आता उपचारानंतर तब्येतीत सुधारणा आहे, अशी माहिती माजी सरपंच सुरेश लहाने यांनी दिली. आत्महत्येचा प्रयत्न करणारे जयराम कान्हेरे यांना केवळ दीड ते दोन एकर शेती आहे.
मुलांना इंग्रजी शाळेत त्यांना टाकायचे होते
त्यावर आई – वडील, पत्नी, मुलगा व मुलगी यांचा ते उदरनिर्वाह चालवतात. त्यांच्या मुलाला इंग्रजी शाळेत त्यांना टाकायचे होते, मात्र आर्थिक परिस्थीती हलाखीची असल्याने त्यांना इंग्रजी शाळेची फिस भरता येणे शक्य नव्हते, मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना मराठा आरक्षणाची गरज असल्याचे ग्रामपंचायत सदस्य सुखदेव कान्हेरे यांनी सांगितले.