कोयत्याने सपासप वार करून तरुणाचा खून; बकोरी रोड वाघोली परिसरातील घटना

  पुणे : वाघोली परिसरातील बीजीएस महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. बकोरी रोडवर हा प्रकार एका मोकळ्या मैदानात घडला आहे. महेश साधू डोके (वय २१, रा. वाडेबोल्हाई) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी कृष्णकांत कमलेशकुमार यादव (वय ३०, रा. आरव ब्लीस सोसायटी राधेश्वरीनगरी, बकोरी रोड, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

  बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा खून

  त्यानुसार सागर गायकवाड याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. तो वाडेबोल्हाई येथील एका वसतिगृहात राहत होता. दरम्यान, तक्रारदार यादव हे राधेश्वरनगरी बकोरी रोड येथे वास्तव्यास आहेत. मंगळवारी दुपारी घरी असताना, घराच्या खिडकीत बसून ते मोबाईल पाहत होते.

  कोयत्याने मारहाण करणारा तरुण दुचाकीवरून पळाला

  त्यावेळी त्यांना एका व्यक्तीचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी खिडकीतून पाहिले तेव्हा एक तरुण दुसर्‍या तरुणाच्या पाठीमागे हातात कोयता घेऊन पळताना दिसला. समोर पळणार्‍या तरुणाच्या अंगावर मोठे रक्त सांडलेले दिसले. त्यांनी खाली उतरून जोरात आवाज दिला. तेव्हा कोयत्याने मारहाण करणारा तरुण दुचाकीवरून पळून गेला. आरोपीने केलेल्या हल्ल्यात डोके गंभीर जखमी झाला होता. रक्ताने त्याचे अंग माखले होते.

  रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित

  यादव यांनी त्यांच्या अंगातील शर्ट काढून डोकेची जखम बांधली. त्यानंतर रुग्णवाहिकेला फोन केला. तेवढ्यात अन्य एका व्यक्तीच्या मदतीने रिक्षातून डोकेला खासगी रुग्णालयात दाखल केले. यादव यांना डोके याने आपले नाव सांगून, त्याच्या ओळखीतील एका व्यक्तीने आपल्याला मारल्याचे सांगितले. डोके याची परिस्थिती गंभीर असल्याचे पाहून, तेथील डॉक्टरांनी ससून रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. ससून रुग्णालयात डोकेला दाखल केले. डॉक्टारांनी तपासले असता, त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.