भाईला शिव्या देत असल्यावरून तरुणावर वार; टोळक्याने हवेत चाकू फिरवून घातला गोंधळ

भाईला (Bhai) शिव्या देत असल्यावरून चौघांच्या टोळक्याने एका तरुणावर हल्ला करून त्याच्यावर चाकूने वार केले. तर, टोळक्याने हवेत चाकू फिरवून गोंधळ घातला. जमलेल्या नागरिकांना देखील या टोळक्याने शिवीगाळ केली. या हल्ल्यात दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

    पुणे : भाईला (Bhai) शिव्या देत असल्यावरून चौघांच्या टोळक्याने एका तरुणावर हल्ला करून त्याच्यावर चाकूने वार केले. तर, टोळक्याने हवेत चाकू फिरवून गोंधळ घातला. जमलेल्या नागरिकांना देखील या टोळक्याने शिवीगाळ केली. या हल्ल्यात दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर, तिघे पसार झाले आहेत.

    याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात हर्षद नितीन खिलारे (वय १८, रा. गुलटेकडी) याने तक्रार दिली आहे. त्यानूसार पोलिसांनी सुयोग भोसले याला अटक केली आहे. तर, तीघे पसार झाले आहेत. रविवारी दुपारी साडे चारच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. यामध्ये हर्षद व अतिश पाटोळे हे दोघेही जखमी झाले आहेत.

    नागरिकांना शिवीगाळ

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद व त्याचे काही मित्र फोटो काढत होते. त्यावेळी सुयोग व इतर तिघे त्यांच्याजवळ आले. त्यांनी तु आमच्या चिक्या भाईला का शिव्या देतो, असे म्हणत वाद घातला. त्यांनी हर्षदला मारहाण करत त्याच्या बरगडीत चाकू खुपसला. त्यावेळी त्याला वाचविण्यासाठी आलेल्या अतिशवर देखील या टोळक्याने हल्ला केला. त्याच्या पाठिवर व पोटात चाकू खुपसून त्याला गंभीर जखमी केले. भरदुपारी वाद झाल्याने नागरिकांनी मोठी गर्दी या परिसरात केली होती. त्यावेळी टोळक्याने हवेत चाकू फिरवून गोंधळ घालत नागरिकांना शिवीगाळ केली. त्यांना धमकावले देखील. पुढील तपास पोलीस करत आहेत.