फोनवरून झालेल्या वादानंतर तरूणाची चाकूने सपासप वार करून हत्या; 24 तासात खुनाची तिसरी घटना

शहरात खूनसत्र सुरूच आहे. फेब्रुवारी महिना सुरू झाल्यापासून सतत खुनाच्या घटनासमोर येत आहेत. जीवघेण्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत खुनाच्या 3 घटना समोर आल्या.

    नागपूर : शहरात खूनसत्र सुरूच आहे. फेब्रुवारी महिना सुरू झाल्यापासून सतत खुनाच्या घटनासमोर येत आहेत. जीवघेण्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत खुनाच्या 3 घटना समोर आल्या. कळमन्यात तरुणाला चाकूने भोसकण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

    अज्जू इब्राहिम शेख (24) रा. गुलमोहरनगर, असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात करण वंजारे नावाच्या तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. तो सध्या फरार आहे. करण गुलमोहरनगरातील चिकन शॉपमध्ये काम करतो आणि तेथेच राहतो. शनिवारी सायंकाळी अज्जू मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. अज्जूचा मित्र रवी चिकन खरेदीसाठी करणच्या दुकानात गेला. फोनवरून दोघांमध्ये वाद झाला. चिडून करणने रवीच्या कानशिलात मारली. रवीने मैदानात येऊन मित्रांना माहिती दिली. रवी, अज्जू आणि इतर दोघे जाब विचारण्यासाठी करणच्या दुकानात गेले. त्याला मारहाण सुरू केली.

    करणने दुकानात ठेवलेला चिकन कापण्याचा चाकू उचलून हल्ला केला. रवी व इतर तरुणांनी पळ काढला. मात्र, अज्जू करणच्या हाती लागला. त्याने अज्जूवर सपासप 5 ते 6 वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळवले आणि फरार झाला.