भांडणात मध्यस्थीसाठी गेलेल्या तरुणावर तिघांकडून हल्ला; चाकूने भोसकले

वडिलांशी भांडण होत असल्याचे पाहून मध्यस्थीसाठी गेलेल्या तरुणावर तीन आरोपींनी हल्ला केला. चाकूने भोसकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना यशोधरानगर पोलिस ठाण्यांतर्गत राणी दुर्गावती चौकात घडली.

    नागपूर : वडिलांशी भांडण होत असल्याचे पाहून मध्यस्थीसाठी गेलेल्या तरुणावर तीन आरोपींनी हल्ला केला. चाकूने भोसकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना यशोधरानगर पोलिस ठाण्यांतर्गत राणी दुर्गावती चौकात घडली. आकाश नामदेव कावडे (वय 26, रा. राणी दुर्गावती चौक) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    पोलिसांनी या प्रकरणी परिसरातच राहणाऱ्या अरमान, आझम उर्फ भुऱ्या आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा नोंदविला आहे. आकाशचे वडील आणि आरोपी अरमान हा राणी दुर्गावतीनगरच्या आठवडी बाजारात फळ-भाज्यांची दुकान लावतात. अरमान हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. तो नेहमीच परिसरातील दुकानदारांवर दादागिरी करतो. रविवारी त्याने आकाशचे वडील नामदेश यांच्याशी विनाकारण वाद घालून शिविगाळ करत होता. त्यामुळे आकाशने त्याला चांगलेच फटकारले.

    यामुळे अरमानने आकाश याच्यासोबतच वाद घालण्यास सुरुवात केली. त्याचे दोन साथीदार ही तेथे आले. तिघांनीही मिळून आकाशला मारहाण सुरू केली. त्याच दरम्यान अरमानने चाकू काढला. त्याच्या साथीदारांनी आकाशला पकडून ठेवले.

    अरमानने चाकूने भोसकून आकाशला गंभीर जखमी केले. त्यानंतर तिन्ही आरोपी तेथून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिस घटनास्थळी पोहोचले. आकाशला उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले. नामदेव यांच्या तक्रारीवरून खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवत आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.