प्रेमसंबंध दुरावल्याच्या रागातून गोव्यातील तरुणीचा खून, आंबोली घाटात फेकला मृतदेह अन्…

हत्या करुन आंबोली घाटाच्या दरीत टाकलेला म्हापसा येथील तरुणीचा मृतदेह पाच तासांनी बाहेर काढण्यात आला. सिंधुदुर्ग पोलीस आणि गोवा पोलीस यांनी ही संयुक्त कार्यवाही केली. मयत तरुणीचे नाव कामाक्षी उडापनाव असे आहे. प्रियकरानेच कामाक्षीचा खून केल्याचे समोर आले आहे.

  सिंधुदुर्ग : हत्या करुन आंबोली घाटाच्या दरीत टाकलेला म्हापसा येथील तरुणीचा मृतदेह पाच तासांनी बाहेर काढण्यात आला. सिंधुदुर्ग पोलीस आणि गोवा पोलीस यांनी ही संयुक्त कार्यवाही केली. मयत तरुणीचे नाव कामाक्षी उडापनाव असे आहे. प्रियकरानेच कामाक्षीचा खून केल्याचे समोर आले असून, आरोपीच्या मित्राने मात्र आपल्याला फसवून तिथे नेल्याचा दावा केला आहे.

  कामाक्षी शंकर उडपनव (वय २८) असे त्या तरुणीचे नाव आहे. प्रेमसंबंध दुरावल्याच्या रागातून ३० ऑगस्ट रोजी प्रकाश चुंचवाड (वय २२), निरूपदी कड (वय २२, दोघे रा. म्हापसा गोवा) या संशयितांनी हा खून केल्याचे समोर आले आहे.

  नेमकं काय आहे घटना? 

  मिळालेल्या माहितीनुसार कामाक्षी ही पर्वरी (गोवा) येथे राहत होती. तिचे प्रकाश याच्याशी गेली तीन वर्षे प्रेमसंबंध होते; मात्र अलीकडे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. यावरून त्या दोघांत खटके उडत असत. मद्यधुंद अवस्थेत तो तिच्याशी भांडण करत असे. तिला पुन्हा प्रेमसंबंध जुळावेत यासाठी गळ घालत असे.

  यातून दोघांमधील भांडणे वाढत असत. त्याने कामाक्षीला ‘तुला मी मारून टाकेन आणि माझा जीवसुध्दा संपविणार आहे,’ अशी धमकी दिली होती. त्याने मारहाणसुध्दा केल्याची तक्रार कामाक्षीने म्हापसा पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र, दोघांचा वैयक्तिक विषय असल्यामुळे पोलिसांनी प्रकाशला समज देऊन सोडून दिले होते. या प्रकारानंतर प्रकाशच्या मनात संताप निर्माण झाला. त्याने ३० ऑगस्टला पर्वरी येथे कामाक्षी राहत असलेल्या फ्लॅटवर येण्याचा आग्रह धरला. त्या दिवशी सकाळीच त्याने कामाक्षीशी संपर्क साधला.

  ‘आपल्याला तुझ्यामुळे पोलिसांची ओरड खावी लागली,’ असे सांगून त्याने वाद घातला. ‘आपल्याला तुला भेटायचे आहे, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही’, असे सांगत दुपारी दोन वाजता प्रकाश तिच्या फ्लॅटवर गेला. यावेळी त्याने सोबत चाकू नेला होता. चाकूने वार करत तिचा खून केला. यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरला. तो लिफ्टमधून खाली आणत गाडीत भरला. यानंतर सुमारे चार तास मृतदेह गाडीतच होता. रात्र होण्याची तो वाट पाहत होता.

  या प्रकारात त्याने मित्र निरुपदी कड याची मदत मागितली. त्याला सोबत घेऊन तो गाडीने आंबोलीच्या दिशेने निघाला. यावेळी बांदा-बावळाटमार्गे त्याने आंबोलीकडे गाडी नेली. वाटेत त्याने मित्राला झालेला प्रकार सांगितला. यामुळे तो घाबरला. दरम्यान, दोघांनी आंबोली घाटाच्या सुरुवातीला नानापाणी वळणापासून काही अंतरावर असलेल्या पारपोली जंगलात रस्त्याच्या बाजूला असलेल्या दरीत हा मृतदेह टाकला व ते दोघे गोव्यात निघून गेले.

  दरम्यान, आपली बहीण बेपत्ता झाली आहे, अशी तक्रार कामाक्षीचा भाऊ अमित शंकर उडपनव याने म्हापसा पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांची तपासाची चक्रे फिरवली. यावेळी तेथील पोलिस निरीक्षक अनंत गोवेकर यांनी आपल्या सहकाऱ्‍यांसमवेत प्रकाश याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत हा सगळा प्रकार उघड झाला. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गोवा पोलिसांचे पथक फॉरेन्सिक पथकाला घेऊन सावंतवाडीत दाखल झाले.

  सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे यांना घेऊन हे पथक आंबोलीत पोहोचले. संशयितांनी दाखवलेल्या ठिकाणी तब्बल दीडशेहून फूट घळणीत मृतदेह दिसून आला; मात्र त्याच दरम्यान मोठा पाऊस आल्यामुळे काही काळ मोहीम थांबली. त्यानंतर दोऱ्‍यांच्या सहाय्याने आंबोली येथील स्थानिक युवक आणि रेस्क्यू पथकाच्या सहाय्याने पाळणे करून हा मृतदेह तब्बल पाच तासांनी वर काढण्यात यश आले.

  यावेळी फॉरेन्सिक पथकाने दिलेल्या माहितीनुसार, कामाक्षी हिच्या मृतदेहाच्या पायाचा व हाताचा भाग गायब असल्याचे दिसून आले. जंगली श्वापदाने हात, पाय कुरतडले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळावर चाकू आणि कपडे आढळून आले आहेत. ते सर्व सामान जप्त करून उत्तरीय तपासणीसाठी कामाक्षीचा मृतदेह बांबोळी-गोवा येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात नेण्यात आला आहे, असे पोलिस निरीक्षक गोवेकर यांनी सांगितले.