नोकरीच्या आमिषाने फेसबुक फ्रेंडकडून तरुणीवर वारंवार अत्याचार; 5 वर्षांपासून सुरु होता प्रकार

तरुणीशी फेसबुकवर एका तरुणाशी मैत्री झाली. त्याने तिला नोकरी लावून देण्याच्या नावावर औरंगाबादला बोलावले. शीतपेयात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. लग्नाचे आमिष दाखवून तिचे सलग 5 वर्षांपर्यंत शोषण केले

    नागपूर : तरुणीशी फेसबुकवर एका तरुणाशी मैत्री झाली. त्याने तिला नोकरी लावून देण्याच्या नावावर औरंगाबादला बोलावले. शीतपेयात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. लग्नाचे आमिष दाखवून तिचे सलग 5 वर्षांपर्यंत शोषण केले आणि नंतर लग्नास नकार देत दगाबाजी केली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी पीडित 30 वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा नोंदविला आहे.

    कुणाल शामराव गजबे (वय 30, रा. दाभा) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी कुणाल हा सध्या इंदोरच्या एका कंपनीत काम करतो. तर पीडित युवती पदवीधर असून, ती शिकवणी वर्ग घेत होती. सोबतच नोकरीसाठी प्रयत्नशील होती. दरम्यान, 2018 मध्ये कुणालने तिच्याशी फेसबुकवर मैत्री केली. ओळख वाढत गेल्याने दोघांनीही एकमेकांचे नंबर घेतले आणि चॅटींग सुरू झाली. कुणालने मोठमोठ्या गोष्टी सांगितल्याने पीडिता त्याच्याकडे आकर्षित झाली. त्याने तिला नोकरी लावून देण्याची बतावणी केली. तेव्हा तो औरंगाबदला नोकरी करत होता. त्याने इंटरव्ह्यूवच्या नावाखाली तिला औरंगाबदला बोलाविले.

    नोकरी मिळत असल्याने पीडिताही कुठलाच विचार न करता औरंगाबादला गेली. तो पीडितेला लोणावळा येथे घेऊन गेला. शीतपेयात गुंगीचे औषधी देऊन तिच्यावर अत्याचार केला. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने जाब विचारला असता लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हा प्रकार नियमित झाला. तो तिच्यासोबत औरंगाबाद येथे ‘लिव्ह इन’मध्ये राहू लागला. नंतर त्याने इंदोरच्या कंपनीत काम सुरू केले. तिथे सुद्धा तो पीडितेला घेऊन गेला.

    मागील पाच वर्षांपासून तो तिचे शोषण करत होता. दरम्यान, पीडितेने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने नकार दिला. या प्रकाराने व्यथित झालेल्या पीडितेने नागपूरला परतून हुडकेश्वर पोलिसात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी आरोपी कुणाल विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.