प्रेम एकीशी अन् लग्न दुसरीशी; झाला ना भांडाफोड, हळद निघण्यापूर्वीच तरूणाला बेड्या

एका तरूणीशी प्रेम केले. तिच्याशी संबंध ठेवले. पण घरोबा मात्र दुसऱ्याच तरूणीशी केला. ही बाब पहिल्या तरूणीला कळताच तिने थेट पोलिसात धाव घेत तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी हळद निघण्यापूर्वीच आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या.

    दारव्हा : एका तरूणीशी प्रेम केले. तिच्याशी संबंध ठेवले. पण घरोबा मात्र दुसऱ्याच तरूणीशी केला. ही बाब पहिल्या तरूणीला कळताच तिने थेट पोलिसात धाव घेत तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी हळद निघण्यापूर्वीच आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या.

    स्वप्नील रामहरी वानखेडे असे आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दारव्हा तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन तरूणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्या सोबत दोन वर्षांपासून स्वप्नीलने शारीरिक संबंधही प्रस्थापित केले होते. त्यानंतर आरोपीने 14 डिसेंबर रोजी दुसऱ्याच तरूणीसोबत लग्न केले. ही बातमी कळताच संतापलेल्या तरूणीने दारव्हा पोलिस स्टेशनला धाव घेऊन लेखी तक्रार दिली.

    पोलिसांनी तत्काळ त्या गावात धाव घेऊन नवीन संसाराची स्वप्न पाहत बसलेल्या आरोपीस ताब्यात घेतले. पोलिसांची गाडी दारापुढे बघताच आरोपी व लग्नाला आलेली पाहुणे मंडळी आवाक् झाली. नवीन नवरी घरात येऊन हळद निघण्यापूर्वीच आरोपी स्वप्नील वानखेडे याच्यावर तुरुंगात बसण्याची वेळ आली.