
'लग्नाला बरीच वर्षे झाली तरी मला मूलबाळ होत नाही. आता तुमच्याकडे बघतोच', असे म्हणून नातवाने आजोबावरच कोयत्याने सपासप वार करुन प्राणघातक हल्ला केला. यामध्ये आजोबाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नेवासा : ‘लग्नाला बरीच वर्षे झाली तरी मला मूलबाळ होत नाही. आता तुमच्याकडे बघतोच’, असे म्हणून नातवाने आजोबावरच कोयत्याने सपासप वार करुन प्राणघातक हल्ला केला. यामध्ये आजोबाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जखमी आजोबाला सोडविण्यासाठी आलेल्या चुलता, भाऊ आणि चुलतीलाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना नारायणवाडी (ता.नेवासा) येथे घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणवाडी (ता.नेवासा) येथील गोकुळ मधुकर क्षीरसागर हा रविवारी रात्रीच्या सुमारास त्याच्या राहत्या घरासमोर कोयता हातात घेऊन घराच्या दरवाजासमोर मारत होता. त्यामुळे आजोबा जालिंदर मुकिंदा क्षीरसागर यांनी गोकुळ यास विचारणा केली. त्यावर संतप्त झालेल्या गोकुळ याने ‘मला लग्नाला इतकी वर्ष झाली तरी मूलबाळ होत नाही. आता तुमच्याकडे बघतोच. तुम्हाला मारुनच टाकतो’, असे म्हणून आजोबा जालिंदर मुकिंदा क्षीरसागर यांच्या तोंडावर कोयत्याचे वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
यावेळी गोकुळपासून जालिंदर क्षीरसागर यांची सुटका करण्यासाठी गेलेल्या त्यांच्या इतर नातेवाईकांवरही गोकुळने हल्ला करत गंभीर जखमी केले. जखमींवर नेवासा फाटा येथील हॉस्पिटमध्ये उपचार सुरु असून, याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात आरोपी गोकुळ क्षीरसागर याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.