संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

नागपूरच्या दिशेने येत असलेल्या रेल्वे गाडीतून विनातिकीट प्रवास करत असलेल्या तरुणाने तिकीट तपासणीस (TC) येत असल्याचे पाहून बाहेर उडी घेतली. यात तो गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचारानंतर त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  नागपूर : नागपूरच्या दिशेने येत असलेल्या रेल्वे गाडीतून विनातिकीट प्रवास करत असलेल्या तरुणाने तिकीट तपासणीस (TC) येत असल्याचे पाहून बाहेर उडी घेतली. यात तो गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचारानंतर त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोहित संतोष सोनी (वय 23, रा. खडगाव रोड, वाडी) असे जखमीचे नाव आहे.

  तिकीट तपासणीदरम्यान सापडल्यास तुरुंगात जाण्याच्या भीतीतून त्याने धावत्या गाडीतून उडी घेतली. ही घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास कामठी रेल्वे स्थानकापूर्वी मिलिट्री गेटजवळ घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

  मोहित हा आई-वडिलांसह मध्यप्रदेशातील रिवा येथून नागपूरला येत होता. मात्र, रिवा इतवारी पॅसेंजर इतवारीपर्यंतच जाते. त्यांना नागपूर रेल्वे स्थानकावर जायचे होते. इतवारी ते नागपूर स्टेशन असा ऑटोचा उगाच खर्च होईल म्हणून तिघेही भंडारा रेल्वे स्थानकावर उतरले आणि महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या आरक्षित (स्लीपर) डब्यात बसले. कारण ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर येते.

  दरम्यान, तिकीट तपासणीसांचे पथक आले. त्यांनी सोनी यांना तिकीट विचारले. मात्र, त्यांच्याकडे तिकीट नव्हते. रेल्वे नियमानुसार त्यांना 3 हजार रुपये दंडाची पावती देण्याची प्रक्रिया सुरू होती. संतोष यांनी सांगितले की, आईवर उपचार सुरू असल्याने त्यांच्याकडे इतके पैसे नाहीत. त्यावर तपासणीसाने दंड भरला नाहीतर तुरुंगात जावे लागेल असे सांगितले.

  तुरुंगाचे नाव ऐकताच मोहित घाबरला. त्याला आपले भविष्य खराब होईल, अशी चिंता वाटली. त्याने कोणताही विचार न करता कामठी रेल्वे स्थानक येण्याच्या दोन मिनिटापूर्वीच लष्कराच्या गेट जवळ गाडीतून उडी घेतली.

  काही वेळातच गाडी कामठी रेल्वे स्थानकावर

  काही वेळातच गाडी कामठी रेल्वे स्थानकावर थांबली. सोनी यांनी धावत्या रेल्वेतून मुलगा पडल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांना सांगितले. कर्तव्यावर असलेले आरपीएफ पथक मोहितच्या आई-वडिलांना घेऊन घटनास्थळी रवाना झाले. मोहित जखमी अवस्थेत होता. त्याला कामठीच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आला. नंतर त्याला मेयो रुग्णालयात रेफर करण्यात आले. सध्या त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी नोंद घेतली आहे.