अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

आलापल्लीवरून एटापल्लीकडे जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला. तर एक जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील आलापल्ली-एटापल्ली मार्गावरील येलचील गावाजवळ घडली.

    अहेरी : आलापल्लीवरून एटापल्लीकडे जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला. तर एक जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील आलापल्ली-एटापल्ली मार्गावरील येलचील गावाजवळ घडली.

    सचिन नागुलवार (वय 34 रा. अहेरी) असे मृतकाचे तर शंकर येडगेम (वय 27 रा. इंदाराम ता. अहेरी) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, सचिन व शंकर हे दोघे दुचाकीने आलापल्लीवरून एटापल्लीकडे जात होते. येलचिल गावापासून एक किमी अंतरावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात सचिन नागुलवार याचा जागीच मृत्यू झाला. तर शंकर येडगेम हा जखमी झाला.

    दरम्यान, अपघात घडताच अज्ञात चालक वाहन घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच येलचिल पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीला उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.