
वडिलांना दारू पाजली आणि आईच्या कानशिलात हाणली मग त्याला जिवंत का ठेवायचा असा विचार करणाऱ्या मुलाने मित्रांच्या मदतीने रवींद्र ऊर्फ गुड्डू हिरामण कावरे (वय 30, रौ. वारकरीटोला (कोटरा) याला बेदम मारहाण करून रस्त्यालगत फेकून दिले.
गोंदिया : वडिलांना दारू पाजली आणि आईच्या कानशिलात हाणली मग त्याला जिवंत का ठेवायचा असा विचार करणाऱ्या मुलाने मित्रांच्या मदतीने रवींद्र ऊर्फ गुड्डू हिरामण कावरे (वय 30, रौ. वारकरीटोला (कोटरा) याला बेदम मारहाण करून रस्त्यालगत फेकून दिले. परंतु नशेत पडून असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 13 नोव्हेंबरच्या रात्री घडली. रवींद्रच्या मृत्यूने गावात खळबळ उडाली आहे.
सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वारकरी टोला कोटरा येथील मृतक रवींद्र ऊर्फ गुड्डू हिरामण कांवरे (वय 30) हा कामासाठी नेहमीच बाहेरगावी जायचा. मात्र, पंधरा दिवसांपासून तो गावी आला होता. वडिलांना दारू पाजली आणि आईला मारहाण केली. या गोष्टीचा राग मनात धरून वृद्धाच्या मुलाने आपल्या काही मित्रांसोबत संध्याकाळी रवींद्रला मोटारसायकलने साखरीटोला येथे नेऊन एका बारमध्ये त्याला दारू पाजली.
गावात रस्त्यावर त्याला मारहाण केली व गावातील शेवटच्या घराच्या बाजूला फेकून दिले. तिकडे रात्रभर रवींद्र घरी पोहोचला नाही. सकाळी घराजवळील नागरिकांना रवींद्र पडलेल्या अवस्थेत दिसला. रवींद्रच्या नातेवाईकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत मृतदेह विच्छेदनासाठी सालेकसा येथे पाठविले. त्याच्यावर पुजारीटोला धरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सालेकसा पोलिस या प्रकरणाचा तपास करीत असून तपासाअंती या घटनेचे खरे कारण पुढे येण्याची शक्यता आहे.