खर्डा येथे युवकाचा खून; शोधासाठी विविध पथके रवाना

खर्डा येथील युवक विशाल ईश्वर सुर्वे (वय ३२) याचा अज्ञात व्यक्तींनी डोक्यावर धारदार शस्त्राने वार करत युवकाचा खून केल्याची घटना घडली.

  जामखेड : तालुक्यातील खर्डा येथील युवक विशाल ईश्वर सुर्वे (वय ३२) याचा अज्ञात व्यक्तींनी डोक्यावर धारदार शस्त्राने वार करत युवकाचा खून केल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवारी (दि. १३) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यानुसार जामखेड पोलिसात त्यांचा भाऊ सुशेन ईश्वर सुर्वे यांनी फिर्याद दिली असून त्याप्रमाणे जामखेड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुशेन ईश्वर सुर्वे (वय २६, रा . सुर्वे वस्ती, खर्डा ता.जामखेड) हा शुक्रवारी खर्डा येथील एका व्यापाऱ्याचा माल आणण्यासाठी बीड जिल्ह्यात गेला होता. काम झाल्यावर रात्री अकरा वाजता खर्डा येथिल व्यापाऱ्यांकडे विशाल याने माल उतरविला व घरी जात आसताना रात्री साडे अकराच्या आसपास सुर्वे वस्ती रोडवरील लक्ष्मीआई मंदिराच्या मागे कच्च्या रस्त्यावर काही अज्ञात इसमांनी विशालच्या डोक्याच्या डाव्या बाजून अज्ञात हत्यारांनी मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

  शनिवारी सकाळी ही घटना स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली. मयत विशाल सुर्वे यांच्या मागे आई वडील, पत्नी, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे त्यांच्या जाण्याने खर्डा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान विशाल सुर्वे या तरूणाच्या निधनामुळे खर्डा परिसरावर शोककळा पसरली आहे. विशाल सुर्वे या तरूणाचा खून कोणत्या कारणामुळे झाला ? विशालच्या खुनामागे कोणाचा हात आहे ? याचा जामखेड गुन्हे शोध पथक वेगाने तपास करत आहे.

  घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच गुन्हे अन्वेषण विभाग, डॉग पथक, ठसे तज्ञ यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच जामखेड पोलिसांनी गुन्हेशोध पथके तयार करण्यात आली असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत आहेत.

  आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना

  खर्डा येथील विशाल सुर्वेच्या गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध शोध पथके तयार करण्यात आली असल्याचे जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी सांगितले.