…अन् ‘त्यानं’ बंद पडलेलं महिलेचे हृदय सीपीआर देऊन केलं सुरु; एनसीसी शिबिरात मिळालेलं प्रात्यक्षिक आलं कामी

हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलेल्या एका वृद्ध महिलेचं हृदय बंद पडलं...धावपळ सुरू झाली...काय करायचं कुणाला कळेना...मात्र, तासगाव तालुक्यातल्या लोढ्याच्या संतोष पाटीलनं कॉलेजमध्ये एनसीसी शिबिरात मिळालेलं सीपीआर प्रात्यक्षिक वापरत बंद पडलेलं हृदय चालू करत महिलेचे प्राण वाचवले.

    तासगाव : हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलेल्या एका वृद्ध महिलेचं हृदय बंद पडलं…धावपळ सुरू झाली…काय करायचं कुणाला कळेना…मात्र, तासगाव तालुक्यातल्या लोढ्याच्या संतोष पाटीलनं कॉलेजमध्ये एनसीसी शिबिरात मिळालेलं सीपीआर प्रात्यक्षिक वापरत बंद पडलेलं हृदय चालू करत महिलेचे प्राण वाचवले. हा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील कामती येथे घडला.

    डी. बी. एफ. एनसीसी कंपनीचा गोल्डन सीनियर अंडर ऑफिसर संतोष सुनिल पाटील व दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूरचा विद्यार्थी व ३८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूरचा छात्र आहे. तो शुक्रवारी आठवडी परेडसाठी बेगमपूर येथून महाविद्यालयासाठी निघाला. कामती गावात तो नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबला. दुपारी आकराच्या दरम्यान एक ५८ वर्षीय वयोवृद्ध महिलेला हृदयविकाराचा झटका येत खाली कोसळली. झटक्याच्या वेदनेने ती तडफड करत शांत झाली. बाजूची मंडळी घाबरून गेली. काय करायचे कुणाला सूचेना.

    संतोषनं तात्काळ धाव घेत परिस्थितीचा अंदाज घेतला. कुणी कांदा, चप्पल नाकाला लावायचा सल्ला दिला. मात्र, त्याने वेळ वाया न घालवता त्या महिलेची तपासणी करून तिचा श्वासोच्श्वास बघितला. त्याला एनसीसी शिबिरातील प्रात्यक्षिक प्रशिक्षणामध्ये शिकलेला सीपीआरची आठवण झाली. त्याने छातीवर दाब देत सीपीआर महिलेला वेळेत दिला. त्यानंतर ती वृद्ध महिला शुद्धीवर आली. बंद पडलेलं हृदय संतोषनं चालू करत प्राण वाचवले. यानंतर आसपासच्या लोकांच्या मदतीने त्या महिलेला नातेवाईकांद्वारे रुग्णालयात पाठवण्यात आले.

    दिल्लीतील परेडला चार राज्यांचे नेतृत्व

    संतोष पाटीलने २६ जानेवारी २०२३ रोजी दिल्ली येथे कर्तव्य पद वर महाराष्ट्र निर्देशालयाचे प्रतिनिधित्व करत पश्चिम विभागीय मार्चिंग समूहाचे नेतृत्व केले होते. या समूहामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व उत्तर प्रदेश या चार राज्यांचे नेतृत्व केले. त्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही सन्मान करण्यात आला आहे.