बिबवेवाडीत तरुणाचा डोक्यात दगड घालून खून; भाचीविषयी वाईट बोलल्याने केले कृत्य

बिबवेवाडीतील बाळासाहेब ओसवाल यांच्या बांधकाम सुरू असलेल्या कॉम्प्लेक्सच्या इमारतीतील एका गाळ्यात तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे.

    पुणे : बिबवेवाडीतील बाळासाहेब ओसवाल यांच्या बांधकाम सुरू असलेल्या कॉम्प्लेक्सच्या इमारतीतील एका गाळ्यात तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. भाचीविषयी वाईट बोलल्यावरून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    बसवराज गजेंत्रे (वय २६, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

    पोलिसांच्या माहितीनुसार, अप्पर डेपो इंदिरानगर परिसरात बाळासाहेब ओसवाल यांच्या कॉम्प्लेक्सच्या (मार्केट) इमारतीचे बांधकाम काम सुरू आहे. त्याठिकाणी गाळे काढण्यात आले आहेत. दरम्यान, एका गाळ्यात तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. ही माहिती मिळताच ओसवाल यांनी घटनास्थळी दाखल होत पोलिसांना याची माहिती कळविली. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी येथे धाव घेतली. त्यावेळी डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे समोर आले.

    दरम्यान, खून झालेला बसवराज हा या कॉम्प्लेक्समध्येच सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता असे सांगण्यात आले. बसवराज व त्याचा मित्र रात्री तिथे बसलेले होते. त्यावेळी बसवराज मित्राला त्याच्या भाचीबाबत वाईट बोलला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर मित्राने डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.