वाढदिवसाचा केक कोयत्याने कापणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात

दहशतीसाठी चौकात वाढदिवसाचा केक धांगडधिंगा करून कोयत्याने कापणाऱ्या बड्डे बॉयला पोलिसांनी अटक केली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. गुन्हे शाखेच्या युनिट एकने पकडले.

    पुणे : दहशतीसाठी चौकात वाढदिवसाचा केक धांगडधिंगा करून कोयत्याने कापणाऱ्या बड्डे बॉयला पोलिसांनी अटक केली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. गुन्हे शाखेच्या युनिट एकने पकडले. त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे. दरम्यान पोलिसांच्या या कारवाईने चौका-चौकात साजरे होणारे वाढदिवस बंद होत आहेत. आतिष जालिंदर लांडगे (वय २६, रा. काशिविश्वनाथ महादेव मंदिरा मागे, काशेवाडी) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहरातील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांकडून गस्त व पेट्रोलिंगवर भर दिला जात आहे. युनिट एकचे पथक हद्दीत गुन्हेगारांची तपासणी करत होते. यावेळी कासेवाडी भागात लांडगेने त्याचा वाढदिवस हा चौकात साजरा केला असून, हातात कोयता घेऊन केक कापला. तर, परिसरात आरडा-ओरडा करत राडा घातल्याची माहिती मिळाली.

    तसेच, त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर देखील असल्याचे पोलिस अंमलदार अमोल पवार यांना समजले होते. त्यानूसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार अमोल पवार, इम्रान शेख अजय थोरात, अय्याज दड्डीकर, दत्ता सोनवणे, अनिकेत बाबर व त्यांच्या पथकाने आतिष लांडगेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कोयता जप्त केला. त्याला पुढील कारवाईसाठी खडक पोलिसांच्या ताब्यात दिले.

    व्हिडिओ व्हायरल अन् बड्डे बॉय जाळ्यात…

    चौकात टेबल टाकून त्यावर वाढदिवसाचा केक कोयत्याने कापला व त्या धांगडधिंग्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. काही तासांत त्याची माहिती पोलिसांना मिळाली अन् या बड्डे बॉयला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या बड्डे बॉयवर कारवाई झाल्याने परिसरातील टवाळखोरांच्या मनात कारवाईची धडकी भरली आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अशा मुलांवर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. असले प्रकार खपवून घेऊ नका असे स्पष्ट आदेश आयुक्तांनी दिल्यानंतर मध्यंतरी जोरदार कारवाई करण्यात आली. त्यानंतर हे प्रकार बंद झाले होते.