दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येणार ट्विस्ट; जिल्हा परिषद सदस्याची थेट केंद्रीयमंत्र्यांशी होणार लढत

बारामतीनंतर सर्वांत सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी अखेर महाविकास आघाडीने भास्कर भगरे यांची उमेदवारी जाहीर केली असून, या मतदारसंघात पहिल्यांदाच केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या विरोधात जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षक भगरे यांच्याशी होणार आहे.

    नाशिक : बारामतीनंतर सर्वांत सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी अखेर महाविकास आघाडीने भास्कर भगरे यांची उमेदवारी जाहीर केली असून, या मतदारसंघात पहिल्यांदाच केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या विरोधात जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षक भगरे यांच्याशी होणार आहे. या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून आहे.

    दिंडोरी राखीव लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील तीन आदिवासी तर तीन मतदारसंघ सर्वसाधारण आहेत. त्यामुळे आदिवासी व इतर मतदारांची समान संख्या असलेल्या या मतदारसंघावर गेल्या दोन दशकांपासून भाजप वर्चस्व ठेवून आहे. यंदाही त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. पाच वर्षे मतदारसंघात केलेली विकासकामे व मोदी सरकारच्या कामांच्या बळावर त्या निवडणुकीला सामोरे जात असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून भास्कर भगरे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आले आहे.

    संपूर्ण महाविकास आघाडी भगरे यांच्या पाठीशी उभी राहिली असून, प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात तर आघाडीने मोठी आघाडी घेतली आहे. जिल्हा परिषद सदस्य राहिलेले भगरे हे शिक्षक म्हणूनही परिचित आहेत. पाठीशी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी वा घराणे नसताना भगरे यांनी महाविकासची उमेदवारी आणण्यात यशस्वी झाल्याने ते पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. परंतु, राजकीय वारसा चालविणाऱ्या डॉ. भारती पवार यांच्यासमोर त्यांचा कितपत टिकाव लागतो, हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.