aaditya thackeray

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार हिरवळ असलेल्या जमिनींवरून कमाई करत आहे. मुंबई मेट्रो 3 कारशेडसाठी मुंबईकरांच्या इच्छेविरुद्ध सूड उगवण्यासाठी आरे जंगलासाठी तडजोड केल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मुंबई: मुंबईत ढासळलेला हवेचा दर्जा आणि महाराष्ट्रातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या (air pollution) मुद्द्यावरून शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. तसेच राज्याला पूर्णवेळ पर्यावरण मंत्री नाही, हा मुद्दाही त्यांनी पत्रात मांडला आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यांत मुंबईतील हवेच्या गुणवत्तेला AQI वर वारंवार ‘खराब’ आणि ‘खूप खराब’ असे रेटींग आहे. महाराष्ट्रातील इतर शहरे देखील हवेच्या गुणवत्तेबद्दल पोस्ट करत आहेत. केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार हिरवळ असलेल्या जमिनींवरून कमाई करत आहे. मुंबई मेट्रो 3 कारशेडसाठी मुंबईकरांच्या इच्छेविरुद्ध सूड उगवण्यासाठी आरे जंगलासाठी तडजोड केल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, “मी केंद्रीय मंत्री भूपिंदर यादव यांना महाराष्ट्राच्या हवेच्या प्रदूषण संकटाबद्दल पत्र पाठवलं आहे. तसेच मुंबईच्या AQI चा मुद्दा मांडला आहे. पूर्णवेळ पर्यावरण मंत्र्याची अनुपस्थिती आणि राज्याच्या बेकायदेशीर सरकारमधील सार्वजनिक समस्यांबद्दल संवेदनशीलतेचा अभाव यामुळे हे संकट अधिकच भयानक झाले आहे, कारण कोणतीही कारवाई होत नाही. बीएमसीची स्टडी कमिटी आणि स्मॉग टॉवर्स केवळ त्यांच्या कंत्राटदारांच्या फायद्यासाठीची युक्ती आहे. या पत्राला प्रतिसाद देऊन हस्तक्षेप कराल अशी अपेक्षा.”

पत्रात पुढे म्हटले आहे की, “महाराष्ट्रात, विशेषतः शहरातील हवेच्या गुणवत्तेची बिघडलेली गंभीर परिस्थिती तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी मी लिहित आहे. नागरिकांच्या जीवनावर दैनंदिन परिणाम करणारी ही समस्या आहे. आव्हानांना तोंड देण्यासाठी धोरणात्मक पातळीवर काहीही होत नाही. परिणामी, शहरांमध्ये ताजी हवा आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे. महाराष्ट्र राज्याला सध्या स्वतंत्र कार्यभार असलेला पर्यावरण मंत्री नाही. हा मुद्दा तुमच्यामार्फत केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही.”

या पत्रात माहुल किंवा वडाळा यांसारख्या पूर्व मुंबईतील ठिकाणी बांधकाम प्रकल्प, रिफायनरी आणि खतनिर्मिती संयंत्रे प्रदूषणाची प्रमुख कारणे आहेत आणि हे प्लान्ट शहरापासून दूर स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे.