आकाश कंदील बनविण्याची लगबग सुरु; कंदीलला परदेशातही वाढतीये मागणी

सातारा शहरातील यादो गोपाळ पेठेतील मिलिंद जंगम व त्यांचे कुटुंबीय सध्या अतिशय बहारदार आणि अतिशय पारंपारिक पर्यावरणपूरक आकाश कंदील बनवण्यात मग्न झाल्याचे दिसून येत आहे. केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे तर त्यांच्या या आकाश कंदीलाची महती संपूर्ण राज्यात नव्हे देशात आणि आता परदेशातही गाजत आहे.

    सातारा : दरवर्षी साजरा होणाऱ्या वर्षातील सर्वात मोठ्या अशा दीपोत्सव सणाची चाहूल आता पूर्णपणे दिसून येऊ लागली आहे. सातारा शहरातील यादो गोपाळ पेठेतील मिलिंद जंगम व त्यांचे कुटुंबीय सध्या अतिशय बहारदार आणि अतिशय पारंपारिक पर्यावरणपूरक आकाश कंदील बनवण्यात मग्न झाल्याचे दिसून येत आहे. केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे तर त्यांच्या या आकाश कंदीलाची महती संपूर्ण राज्यात नव्हे देशात आणि आता परदेशातही गाजत आहे.

    आपल्या पाहुण्यांना हे आकाश कंदील व्यवस्थित पॅकिंग बॉक्सद्वारे आता अमेरिका, लंडन, दुबई, अबुधाबी, ऑस्ट्रेलिया येथेही पाठवण्याची सुविधा जंगम परिवाराने करून दिल्याने अनेक सातारकरांनी हे अतिशय सुबक नीटनेटके व्यवस्थित पॅकिंग केले जाणारे आणि तितकेच आकर्षक आकाश कंदील अगदी योग्य आणि रास्तभावात खरेदी करून आपल्या पाहुण्यांना पाठवले सुद्धा आहेत. षटकोनी, गोल, कोयरी, लंबगोल, दंडगोल अशा आकारातील झुरमुळ्यांचे आकाश कंदील अक्षरशः नजरेत भरत आहेत.

    वेगळेपण कायम

    विविध रंगांची सुबक नक्षी त्याला वापरले जाणारे तितकेच टिकाऊ आणि सोयीचे असे पर्यावरण पूरक पुठ्ठा, लाकडी पट्ट्या, लेस, रंगीबेरंगी मणी, खडे व रीबिनी यामुळे आकाश कंदील अगदी चिनी व्यापारी तत्त्वावर सुद्धा मात करून आपली खासियत जपून आहेत.