‘दादा, पुण्यातील विक्रम-वेताळ खेळ थांबवा’; आम आदमी पक्षाचे चंद्रकांत पाटलांना पत्र, पत्रात आणखी म्हटलंय…

महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता आम आदमी पक्षाने पुण्याचे पालकमंत्री आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना एक पत्र लिहिले.

पुणे : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता आम आदमी पक्षाने पुण्याचे पालकमंत्री आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना एक पत्र लिहिले. त्यामध्ये त्यांनी पुण्यातील विक्रम-वेताळ खेळ थांबवा, असे आवाहन केले आहे.

काय आहे पत्रात?

माननीय चंद्रकांत दादा,

पुण्यात चाललेला ‘विक्रम- वेताळ’ हा खेळ बघितल्यावर कोथरुड, बावधन, पाषाण, बाणेर येथील सुज्ञ रहिवाशांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, पुण्याचे पालकमंत्री व कोथरुड विधानसभेचे आमदार असणाऱ्या चंद्रकांतदादांचे खरेच कोथरुडवर प्रेम नाही का ? दादा, तुम्ही कोथरूडचं वैभव का नष्ट करत आहात ? खरं म्हणजे ऐनवेळी कोल्हापुरातून कोथरुडमध्ये येऊन स्थानिक उमेदवारांना बाजूला सारुन भाजपने तुमची उमेदवारी घोषित केली आणि त्याला कोथरुडमधील जनतेने प्रतिसाद देखील दिला. असे असून सुद्धा तुम्ही कोथरुडकरांवर का सूड उगवत आहात? कोथरुडकरांच्या प्रेमाची भरपाई तुम्ही अशी कराल याची अपेक्षा कोथरुडवासियांना नव्हती.

ज्याला कोथरुडचं वैभव आणि पुणे शहराचं फुफ्फुस समजलं जातं त्या शांत, निसर्गरम्य वेताळ टेकडीला गिळंकृत करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार हे सरसावलेले आहेत. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार हे स्वतःला ‘विक्रम- वेताळ’ या गोष्टीतील राजा विक्रम समजत आहेत आणि स्वतः सोबत वेताळ टेकडी फोडून घेऊन जायचा दररोज प्रयत्न करत आहेत. गोष्टीतील राजा विक्रम हा जरी एक प्रामाणिक राजा होता तरी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार हे प्रामाणिक प्रशासक आहेत, असं म्हणता येणार नाही.

वेताळ टेकडी फोडून त्या ठिकाणी रस्ते, बोगदा व तथाकथित इतर कामे करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने त्यांनी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. महानगरपालिकेत, राज्यात व केंद्रात भारतीय जनता पार्टीचं ट्रिपल इंजिनचे सरकार असताना कोथरुडचा श्वास असलेल्या व पुण्याचे फुफ्फुस असलेल्या वेताळ टेकडीचा घास घेतला जात असेल तर सर्वसामान्य कोथरुडकर जनतेने तुम्हाला निवडून दिल्याचा फायदा काय?, असा सवाल उपस्थित करण्यात आला.

विकासकामांना विरोध नाही पण…

दादा, विकास कामांना विरोध नाही. पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्ते बनवायला पाहिजेत. ते जरुर बनवा… परंतु पुणे शहरातील ऑक्सिजन निर्मितीचे केंद्र असलेल्या या टेकड्याफोडून, निसर्ग नष्ट करून रस्ते बनवणे, बोगदे बनवणे हे सामान्य पुणेकरांना मान्य नाही. तुमचा पक्ष कितीही पॉवरफुल पक्ष असला तरी तुम्ही केवळ रस्ते बनवू शकाल… पण तुम्ही शहराच्या मधोमध पुन्हा टेकड्या आणि निसर्ग बनवू शकणार नाही. त्याला ब्रह्मदेवच लागेल ! … आणि तुमचा पक्ष काही ब्रह्मदेव नाही. तेव्हा एक साधी विनंती आहे की, किमान भस्मासुर तरी बनू नका. जे बनवता येत नाही, ते नष्ट करु नका, असेही त्यामध्ये म्हटले आहे.