केजरीवालांच्या घरावरील हल्ल्याचे मुंबईत पडसाद – आम आदमी पक्षाचे मुंबई भाजप कार्यालयासमोर आंदोलन, प्रविण दरेकरांच्या राजीनाम्याची केली मागणी

मुंबै बँक (Mumbai Bank) घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party)  अचानक आक्रमक भूमिका घेत मुंबईत भाजप कार्यालयासमोर (Mumbai BJP Office) आंदोलन केले आहे. प्रवीण दरेकरांचा जोपर्यंत राजीनामा घेणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत होणार नाही. असाही इशारा आपने दिला आहे.

    मुंबई : द काश्मिर फाईल्स (The Kashmir Files) सिनेमाबाबत वेगळी मते व्यक्त केल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर भाजप कार्यकर्त्यांनी दिल्लीत हल्ला केला. त्याचे पडसाद मुंबईत उमटले असून मुंबै बँक (Mumbai Bank) घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party)  अचानक आक्रमक भूमिका घेत मुंबईत भाजप कार्यालयासमोर (Mumbai BJP Office) आंदोलन केले आहे.

    दरेकर यांच्या राजीनाम्याची मागणी
    मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी असताना प्रविण दरेकर यांनी घोटाळे केल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत आम आदमी पक्ष आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईत भाजप कार्यालयासमोर आपने आंदोलन केले आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवणारे भाजप नेते प्रवीण दरेकर सध्या अडचणीत आहेत. प्रवीण दरेकर यांनी कामगार असल्याचे सांगून कामगार सहकारी संस्थेकडून २५,००० रुपये मोबदला घेतला, असे मुंबई पोलिसांनी न्यायालयात सांगितले, होते. यावर आता आप यांनी आक्रमक भूमिका घेत प्रविण दरेकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

    पोलिसांनी आपच्या कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
    आपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यलयासमोर आंदोलन केले. यावेळी त्यांनी प्रविण दरेकर आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकरणावर दरेकर यांनी असा दावा केला होता की आर्थिकदृष्ट्या स्थिर झालेल्या व्यक्तीला सोसायटीच्या सदस्यत्वातून काढून टाकण्याबाबत कोणतेही नियम नाहीत. या आंदोलनावेळी पोलिसांकडून आंदोलनकांची धरपकड करण्यात आली. यावेळी दरेकरांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लागवले आहेत. तर प्रवीण दरेकर चोर है…गली गली मे शोर है, बीजेपीवाले चोर है…च्या जोरदार घोषणा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आल्या. यावेळी आंदोलकांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत आपच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

    जोपर्यंत राजीनामा नाही, तोपर्यंत आम्ही शांत होणार नाही
    ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पार्टीने यात उडी घेतल्याने आगामी निवडणूक आणखी चुरशीची होणार आहे. पोलीस दडपशाही करत आहेत, असा आरोप यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी केला. तसेच भाजपला जरा जरी लाज उरली असेल तर मुंबईला लुटणाऱ्या प्रवीण दरेकरांचा राजीनामा घ्यावा, अशी तिखट प्रतिक्रिया यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. प्रवीण दरेकरांचा जोपर्यंत राजीनामा घेणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत होणार नाही. असाही इशारा आपने दिला आहे.